27.9 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeधाराशिवउस्मानाबाद मतदारसंघातील दिर-भावजयची लढत ठरतेय लक्षवेधी

उस्मानाबाद मतदारसंघातील दिर-भावजयची लढत ठरतेय लक्षवेधी

धाराशिव : सुभाष कदम
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर या दिर-भावजय मधील लढत संपूर्ण महाराष्ट्रात लक्षवेधी ठरली आहे. या दोन्ही उमेदवारांसाठी देश, राज्य पातळीवरील नेत्यांनी सभा घेतल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आकड्यामध्ये बलाढ्य दिसणा-या महायुतीच्या उमेदवार अर्चनाताईंना महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजें यांनी कसलीही कसर न ठेवता निकराची झुंज दिली. या लढतीमध्ये कोण विजेता होईल, याचा अंदाज तज्ञ राजकीय जाणकारांनाही आलेला नाही. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.

महायुतीच्या अर्चनाताई पाटील व महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर हे दोघे नात्याने दिर-भावजय असून त्यांच्यात पारंपारिक लढत होत आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लगेचच ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. त्यामुळे ओमराजेंनी त्याक्षणी प्रचाराला सुरूवात केली. महायुतीच्या उमेदवाराचा विषय अनेक दिवस प्रलंबित राहीला. अखेर अर्चनाताईंना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन उमेदवारी दिली. त्यानंतर महायुतीच्या प्रचाराला सुरूवात झाली. अर्चनाताईंचा उमेदवारी अर्ज भरताना उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत, मंत्री संजय बनसोडे यांच्यासह महायुतीच्या मतदार संघातील सर्वच आमदारांनी हजेरी लावली. त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री धनंजय मुंडे आदींनी सभा घेऊन वातावरण निर्मिती केली.

उस्मानाबाद मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून यापैकी पाच आमदार महायुतीचे आहेत. याशिवाय औसा व उमरगा विधानसभा मतदारसंघाचे प्रत्येकी दोन-दोन टर्मला प्रतिनिधीत्व केलेले माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. माजीमंत्री मधुकरराव चव्हाण यांचे सुपूत्र सुनील चव्हाण यांनीही काँग्रेसचा त्याग करत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आकड्याकडे या मतदारसंघात महायुती बलाढ्य दिसत आहे. त्या तुलनेत महाविकास आघाडी कमजोर दिसत आहे. कळंब-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील कैलास पाटील हे एकमेव महाविकास आघाडीचे आमदार आहेत. त्यांच्या जोडीला माजी आमदार राहुल मोटे व ज्ञानेश्वर पाटील आहेत. यांच्या साथीने ओमराजे निंबाळकर यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. महायुतीच्या उमेदावाराशी निकराची झुंज दिली आहे. ओमराजे यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिव शहरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी तुळजापूर, माजी मंत्री तथा काँग्रेसचे युवानेते अमित विलासराव देशमुख यांनी तुळजापूर, उमरगा येथे, माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांनी औसा येथे, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आदींनी सभा घेऊन वातावरण निर्मिती केली आहे. आकड्यामध्ये बलाढ्य दिसणा-या महायुतीला ओमराजेंनी ताकदीने टक्कर दिली आहे.

देशात व राज्यात राजकारण एका वेगळ््या वळणावर आलेले असतानाच लोकसभेची पहिली निवडणूक होत आहे. मतदारांच्या मनात नेमके काय चाललेय, वेगळ््या वळणावर गेलेले व पक्ष फोडाफोडीचे राजकारण मतदारांना भावलेय की नाही, याचा अंदाज तज्ञ राजकीय जाणकारांनाही आलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात लक्षवेधी ठरलेल्या उस्मानाबादच्या दिर-भावजय लढतीकडे व निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR