30.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeलातूरनिलंग्यात एकच फॅक्टर.. काळगे डॉक्टर

निलंग्यात एकच फॅक्टर.. काळगे डॉक्टर

लक्ष्मण पाटील
निलंगा (प्रतिनिधी)- गत दहा वर्षांपासून देशात गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपाची सत्ता असून देखील निलंगा तालुक्यातील ग्रामीण भाग विकासापासून वंचित राहिल्याने ग्रामीण भागात भाजपाविषयी संतापाची लाट आहे. निलंगा मतदारसंघाचा विकास होईल म्हणून मतदाराने मोठ्या अपेक्षेने विकासाच्या गप्पा मारणा-या भाजपाच्या उमेदवाराला लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडून दिले. मात्र विकास तर बाजूलाच राहिला कुठे घोंगडे भिजले कुणास ठाऊक.खासदार महोदयांनी निलंग्याकडे पाठ फिरवत ते निलंगा मतदारसंघाकडे फिरकलेही नाहीत. म्हणून निलंगेकर उच्च शिक्षित भूमिपुत्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यामुळे निलंग्यात एकच फॅक्टर.. काळगे डॉक्टर असे मतदारांतून चर्चिले जात आहे.

लातूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे हे उच्च शिक्षित तर भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे अशिक्षित असल्याने ही निवडणूक सुशिक्षित विरुद्ध अशिक्षित अशी रंगतदार होत असल्याचा बोलबाला निलंगा मतदारांतून ऐकावयास येत आहे. तसेच निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी सुरुवातीपासूनच प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. तर भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारयंत्रणेमध्ये सुसूत्रता नसल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे दिसते. ही निवडणूक विद्यमान खासदारांना अवघड जाणार आहे. कारण २०१९ ची परिस्थिती आज नाही. पाच वर्षांमध्ये लोकांच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बेरोजगारी, महागाईचा विषय व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मराठा द्वेषाचा विषय मतपेटीतून व्यक्त होणार असल्याचे सर्वसामान्य नागरिकांतून बोलले जात आहे.

मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर असल्याने विद्यमान आमदार व खासदारांना मतदारांनी केलेली गावबंदी, शेतक-यांचे आंदोलन मोडीत काढणे, महागाई, सुशिक्षित बेरोजगारी आणि निवडून आल्यानंतर विद्यमान खासदारांनी निलंगेकरांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. ते निलंगा मतदारसंघाकडे फिरकलेही नसल्याने भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्याविषयी तीव्र नाराजीचा सूर असल्याचे मतदारांतून बोलले जात आहे. निलंगा मतदारसंघातील ग्रामीण भागात गावागावांना जोडणा-या रस्त्याची दयनीय अवस्था, वीज, पाणी व मूलभूत सुविधेपासून अनेक गावे वंचित असल्याने याचाही फटका भाजपाच्या उमेदवाराला बसणार असल्याचे दिसते. तसेच काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात घेतलेली आघाडी ती कायम ठेवली आहे.

मतदारसंघात विकासाची वानवा
दुसरीकडे भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांची प्रचार यंत्रणा सुरुवातीपासूनच मंदावलेली असल्याचे चित्र निलंगा मतदारसंघात पहावयास मिळाले. गत दहा वर्षांपासून निलंगा मतदारसंघात विकासाची वानवा झाली आहे. विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांनी निवडून आल्यानंतर पाच वर्षे निलंगा मतदारसंघाकडे पाठ फिरवल्याने आता निलंग्यात एकच फॅक्टर.. काळगे डॉक्टर असे जाणकार मतदारांतून चर्चिले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR