मुंबई : भारताच्या सीमेवर कमालीचा तणाव असताना मुलाखत, गप्पा यासारखे कार्यक्रम करणे उचित नाही, असे माझे मत आहे असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची एका वृत्तवाहिनी सोबत होणारी मुलाखत पुढे ढकलण्यात आली आहे.
अशा काळात सर्व देशाने एकजूट असणे आणि भारतीय सैन्य आणि सीमा भागातील भारतीय नागरिकांच्या सोबत असणे, त्यांच्यासाठी प्रार्थना करणे, हे महत्त्वाचे आहे, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता ही मुलाखत रद्द झाल्याची सर्वांनी नोंद घ्यावी. इतर सर्व विषयांवर आपण सविस्तर बोलणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या संदर्भात एका पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे.
जेंव्हा देशांच्या सीमांवर कमालीचा ताण तणाव असताना, मुलाखत, गप्पा अशासारखे कार्यक्रम करणे उचित नाही असे माझे मत आहे. या काळात सर्व देशाने एकजूट असणं आणि भारतीय सैन्य आणि सीमाभागातील भारतीय नागरिकांच्या सोबत असणं, त्यांच्यासाठी प्रार्थना करणं हेच महत्वाचं आहे. राज ठाकरे यांनी कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सरकारच्या चुका या तुम्हाला दाखवल्याच पाहिजेत.
ज्यावेळेला हा प्रकार झाला त्यावेळी पंतप्रधान सौदी अरेबियामध्ये होते, तिथला दौरा अर्धवट सोडला त्यांनी आणि नंतर बिहारला कॅम्पेनला गेले. मला वाटते हे करायची गरज नव्हती. परत केरळमध्ये जाऊन तिथे अदानीच्या पोर्टचे उद्घाटन केले. परत वेव्हचा कार्यक्रम केला. इतकी जर गंभीर परिस्थिती आहे तर या गोष्टी टाळता आल्या असत्या. नंतर येऊन मॉक ड्रिल करायचे वगैरे हे काही उत्तर नाही यावरचे. जे अतिरेकी आहेत त्यांना हुडकून काढणे हे करणे महत्त्वाचे आहे. मॉक ड्रिल करण्यापेक्षा देशभर कोम्बिंग ऑपरेशन करा अशी मागणी देखील त्यांनी केली होती.