मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या विविध भागांत मागच्या १२ दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक भागात पाणीच पाणी झाले आहे. नदी-नाले भरून वाहत आहेत. दुस-या बाजूला काही भागांत शेती पिकांना मोठा फटका बसला. आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात दमदार पाऊस झाला. मराठवाड्यात बहुतांशी भागात शनिवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. मात्र, सायंकाळी काही वेळ उसंत दिली. परंतु आकाशात काळेकुट्ट ढग आहेत. त्यामुळे केव्हाही दमदार पाऊस बरसू शकतो.
मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. विशेषत: लातूर, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात रोज कुठे ना कुठे अवकाळी पाऊस कोसळत आहे. लातूर जिल्ह्यात तर शनिवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला होता. त्यामुळे सरीवर सरीं दमदारपणे कोसळत होत्या. गेल्या १० ते १२ दिवसांपासून अखंडित पाऊस सुरू असल्याने शेतकरी धास्तावला आहे. विदर्भातील वाशिम, बुलडाणा, यवतमाळ गडचिरोली, चंद्रपूर, नंदूरबार जिल्ह्यात गेल्या १३ दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस सुरू असून, विदर्भातील ब-याच भागात याचा मोठा फटका बसला. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहात आहेत. पश्चिम महाराष्ट्रातही कृष्णा, वेण्णा, कोयना, पंचगंगा दुथडी भरून वाहू लागली आहे.
मराठवाड्यात लातूरसह धाराशिव, बीड, परभणी, हिंगोलीतही शनिवारी सकाळपासून दमदार पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. जोरदार पावसामुळे लातूर जिल्ह्यात शेती पिके, फळझाडांची मोठी हानी झाली. तसेच शेतातील पिके अक्षरश: जागेवरच नासली आहेत. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातही शहरासह पंढरपूर, सांगोला, करमाळा, माढा, माळशिरस तालुक्यात दमदार पाऊस झाला.
मशागतीची कामे खोळंबली
राज्यात लवकरच मान्सून धडकणार आहे. तत्पूर्वी शेतकरी पेरणीची तयारी करीत असतात. परंतु गेल्या १३ दिवसांपासून राज्यात ब-याच भागात मान्सूनपूर्व दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतक-यांची खरीप मशागतीची कामे खोळंबली आहे. तसेच वातावरणात गारवा निर्माण झाल्याने शेतीची समस्या निर्माण झाली आहे.
८५ तालुक्यांना फटका
राज्यात मे महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील जवळपास ८५ तालुक्यांत अवकाळी पावसाचा शेतक-यांना फटका बसला. २२ हजार २३३ हेक्टर क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झाले आहे. मका, ज्वारी, भाजीपाला, संत्रा, भात, आंबा, फळपिके या पिकांचे मोठे नुकसान झाले.