28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रचेहरे बघून सरकारने दुष्काळ जाहीर केले

चेहरे बघून सरकारने दुष्काळ जाहीर केले

विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा आरोप

नागपूर : राज्य सरकारने ४० तालुके दुष्काळग्रस्त घोषित करून राज्यातील जनतेवर अन्याय केला आहे. चेहरे बघून सरकारने घोषणा केली आहे अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विजय वडेट्टीवार नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीच्या काळात ९६०० रुपयांपर्यंत सोयाबीनचा भाव गेला होता, आता तो दर का मिळत नाही, राज्य सरकार शेतक-यांवर अन्याय करत आहे. सोयाबीनला दोन हजार रुपये क्विंटल आणि कापसाला तीन हजार अनुदान द्यावे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कँग्रेसला अनुकुल वातावरण आहे. शिंदे सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या विरोधात जनतेची नाराजी आहे. ग्रामीण भागात कॉंग्रेस-महाविकास आघाडीच्या बाजूने जनता आहे, राज्यात ८० टक्के ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा विजय दिसेल, असे वडेट्टीवार म्हणाले.

मुख्यमंर्त्यांनी गणेश उत्सवात सेलिब्रेटींना बोलावून आरती करण्याचे पहिल्यांदाच पाहिले, वर्षावर जाण्यापूर्वीदेखील एल्विशवर महिलांबाबत घृणास्पद बोलण्याचे आरोप होते, तरीही त्याला आमंत्रित केले, असेही वडेट्टीवार म्हणाले.
अजित पवार यांच्या आईने मुलगा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. प्रत्येक आईचे स्वप्न असतेच, ते स्वप्न कसे आणि कोण पूर्ण करणार. जे पूर्ण करणार होते ते आता दिसत नाही. राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे. अजित दादासाठी आई म्हणून त्यांचा भावना योग्य आहेत असेही वडेट्टीवार म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी अंबाझरी आणि नागनदीबाबत आराखडा जाहीर केला आहे. ९ वर्षांनंतर म्हणजे पूर आल्यावर आराखडा तयार करीत आहेत, साप निघून गेल्यावर लाठी मारण्यासारखे आहे, निवडणूक तोंडावर असताना या आराखड्याला काही महत्त्व नाही अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

कायद्याच्या चौकटीत जे बसेल असे आरक्षण मराठा समाजाला द्यावे. मात्र ओबीसीचे नुकसान कसे भरून काढणार. ३२ टक्के मराठा लोकसंख्या यापूर्वी दाखवली, हे सगळे ओबीसीमध्ये होते, पुन्हा नव्याने प्रमाणपत्र देत आहेत, याचा अधिवेशनात जाब विचारणार आहे. संख्या वाढवली जात आहे. पण आरक्षण वाढत नाही. १९ टक्के ओबीसी, ११ टक्के व्हीजेएनटीला आरक्षण आहे. लोकसंख्या बघता हा अन्याय आहे, मराठा समाजाला देत असताना सगळीकडे बघायला पाहिजे, सरकारचा हा आरक्षण संपवण्याचा घाट तर नाही ना, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR