नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी चोरीवरून विरोधकांनी सत्ताधा-यांना सळो की पळो करून सोडले आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पेलेट गनच्या वापरावरून विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्ला चढवला आहे. अमित शहा यांनी संसदेत यावे आणि यावर चर्चा करावी अशी मागणी विरोधक करत आहेत. मात्र अधिवेशन सुरू होऊन १३ दिवस झाले तरी अमित शहा संसदेकडे फिरकलेले नाहीत. यावरून आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्यावर खरपूस टीका केली आहे. गृहमंत्री विद्यार्थ्यांचे गुन्हेगार, म्हणूनच ते तोंड लपवतायत, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली.
पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यातही विरोधकांनी सत्ताधा-यांना कोंडीत पकडले असून बुधवारी संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकारविरोधात संसद परिसरामध्ये मोर्चा काढला. संसद परिसरातील प्रेरणा स्थळावरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून मकर दारापर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, खासदार प्रियंका गांधी यांच्यासह इंडिया आघाडातील पक्षाचे खासदार सहभागी झाले. विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचे आदेश कोणी दिले? असा थेट सवाल राहुल गांधी यांनी केला. या मुद्द्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत येऊन स्वत: उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. तसेच चंदा चोर कहां मिलेंगे भाजप के दफ्तर में!’’ अशा घोषणा देत संसद परिसर परिसर दणाणून सोडला.
















