मुंबई : प्रतिनिधी
बनावट कागदपत्रे देऊन मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका लाटल्याच्या प्रकरणात नाशिक न्यायालयाने राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावल्यामुळे कोकाटे यांचे मंत्रीपद यांची आमदारकी धोक्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदावर सावट असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आणखी एक मंत्री अडचणीत आले आहेत. भ्रष्ट मंत्री माणिकराव कोकाटे व धनंजय मुंडे यांची तत्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटातील लोकांना कमी दरात सदनिका दिली जाते. १९९५ साली माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी बनावट कागदपत्रे सादर करून नाशिकमधील एका इमारतीत चार सदनिका घेतल्याची तक्रार दाखल झाली होती. याची चौकशी करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणावर निकाल देताना नाशिक न्यायालयाने राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षांचा तुरुंगवास आणि प्रत्येकी ५० हजार रुपये दंडाची शिक्षा आज ठोठावली. दोन वर्षांची शिक्षा झाल्याने कोकाटे यांचे मंत्रिपद तर धोक्यात आलेच आहे, पण आमदारकीही जाण्याची शक्यता आहे.
लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाल्यास सदस्यत्व रद्द होते. यापूर्वी मागच्या विधानसभेत बँक घोटाळा प्रकरणात काँग्रेस आमदार सुनील केदार यांना शिक्षा झाल्यानंतर त्याचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.
लोकप्रतिनिधींना दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीची शिक्षा झाल्यास खासदार किंवा आमदार लगेचच अपात्र ठरतात अशी तरतूद लोकप्रतिनिधी कायद्यात आहे. याच तरतुदीनुसार सुरत न्यायालयाने काँग्रेसने नेते राहुल गांधी यांना अब्रुनुकसानीचा खटल्यात शिक्षा सुनावताच त्यांची खासदारकी लोकसभा अध्यक्षांनी रद्द केली होती.
परंतु सर्वोच्च न्यायालयाने सुरत न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने अपात्रतेचा निर्णय मागे घ्यावा लागला होता. त्याप्रमाणे कोकाटे यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली तरच कोकाटे यांची आमदारकी वाचू शकते. पण मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी मात्र विरोधकच नाही तर सत्ताधारी महायुतीतूनही मोठा दबाव असणार आहे. यामुळे शिक्षेला स्थगिती मिळो किंवा नाही, कोकाटे यांचे मंत्रीपद जाणार, अशी चर्चा आहे. धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यामुळे आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका होत असताना माणिकराव यांची ते किती पाठराखण करणार याबद्दलही शंका व्यक्त होतेय.
कोकाटे, मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा : सपकाळ
भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार भ्रष्ट मंत्र्यांची टोळी बनली आहे. शेतक-यांच्या नावावर माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचार करताना सर्व मर्यादा ओलांडल्याचे उघड झाले आहे. आता माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या दोघांना मंत्रीमंडळातून बरखास्त करा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
अजित पवार भ्रष्ट मंत्र्यांना पाठिशी घालतायेत
एकीकडे राज्यातील शेतकरी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून आत्महत्या करत असताना राज्यातील मंत्री मात्र कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करत आहेत, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला शोभणारे नाही. मुंडे व कोकोटे हे दोन्ही मंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. पण उपमुख्यमंत्री अजित पवार या भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरी आता तरी हिम्मत दाखवून भ्रष्ट मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना एका बोगस प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा झाली होती तेव्हा वायुवेगाने चोवीस तासांच्या आत त्यांची खासदारकी रद्द केली व घर काढून घेतले होते त्याच वेगाने कोकाटे यांच्यावर कारवाई होणार का? आसा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केला.