28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरजिजाऊंच्या हजारो लेकींची गर्जना

जिजाऊंच्या हजारो लेकींची गर्जना

लातूर : प्रतिनिधी
मराठा समाजाला सरसकट ५० टक्क्यांच्या आतील कुणबी आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दि. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी लातूर शहरातून कँडल मोर्चा काढण्यात आला. हा लक्षवेधी कँडल मोर्चा गंजगोलाईतून निधाला. मेन रोड, महात्मा गांधी चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा कँडल मोर्चा पोचल्यानंतर मोर्चाचा समारोप झाला. मोर्चात जिजाऊंच्या हजारो लेकींनी मराठा आरक्षणासाठी गर्जना केली. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांचाही या मोर्चात सहभाग होता.

राज्यात सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून समाजांकडून आरक्षणाची मागणी होत असताना सरकारी पातळीवर समाधानकारक काम होताना दिसत नसल्याने सरकारबद्दल तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे. सरकारने स्वत: वेळ मागुन घेतले आणि त्या वेळेत काहींच केले नाही. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाला नवे बळ देणारे मनोज जरांगे पाटील दि. २५ ऑक्टोबरपासून पुन्हा उपोषण करीत आहेत. त्यामुळे संपूर्ण मराठा समाजातून सरकारवर रोष व्यक्त केला जात आहे. लातूर शहरासह जिल्ह्यातही मराठा आरक्षण आंदोलनास अनुरुप विविध प्रकारची आंदोलने होत आहेत. मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजाकडून उपोषण, धरणे, रास्ता रोको, अशा प्रकारची आंदोलने केली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी कँडल मोर्चा काढण्यात आला.

शहराच्या चारही दिशांतून युवक, युवती, लहान मुले, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरीक जय जिजाऊ, जय शिवराय, असा जयघोष करीत गंजगोलाईत एकत्र आले आणि भव्य कँडल मोर्चाला सुरुवात झाली. गंजगोलाई, हनुमान चौक, महात्मा गांधी चौक मार्गे हा कँडल मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोंचल्यानंतर कँडल मोर्चाचा समारोप झाला. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं’, ‘देत कसं नाही, घेतल्या शिवाय राहात नाही’, ‘हम सब जरांगे’, ‘एक मराठा, लाख मराठा’, अशा घोषणा युवक, युवती आणि मोर्चात सहभागी सर्वचजण देत होते. जिजाऊंच्या लेकींच्या गर्जनेने सारा आसमंत दुमदुमून गेला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR