33.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeधाराशिवविजय दंडनाईक यांचा जामीन फेटाळला

विजय दंडनाईक यांचा जामीन फेटाळला

सर्व संचालकांचे जामीनही यापुर्वी फेटाळले

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव शहरातील शिवाजी चौकातील वसंतदादा नागरी सहकारी बँकेत आर्थिक घोटाळा करून ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेचे तत्कालिन चेअरमन विजय दंडनाईक, तत्कालिन व्यवस्थापक दीपक देवकते, संचालक मंडळ व कर्मचारी यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात तीन महिन्यापुर्र्वी गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार विजय दंडनाईक हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा, म्हणून अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सोमवारी दि. ३० ऑक्टोबर रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश किरण बागे-पाटील यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, तत्कालिन चेअरमन विजय दंडनाईक यांचा अटकपुर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

अन्य संशयित आरोपींनी ही जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने यापुर्वीच फेटाळून लावला आहे. त्यामुळे या आरोपींनी छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात धाव घेतली आहे. खंडपीठानेही काही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे. वसंतदादा बँकेच्या पदाधिकारी, कर्मचा-यांनी ठेवीदारांना ठेवीवर जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून बँकेत ठेवी ठेवण्यास भाग पाडले. ठेवीची मुदत संपली तरीही ठेवीदारांचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे ठेवीदार पतसंस्था असलेल्या प्रभात सहकारी पतपेढीने दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तीन महिन्यापुर्र्वी २८ जुलै रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून पोलीस निरिक्षक संतोष शेजाळ तपास करीत आहेत.

वसंतदादा बँकेचे तत्कालिन चेअरमन विजय दंडनाईक, तत्कालिन व्यवस्थापक दिपक देवकते, संचालक मंडळ व जवळपास १९० बनावट कर्जदार यांनी संगणमत करून २०१२ ते २०१७ या कालावधीत वसंतदादा बँकेत पुरेशे तारण न घेता फाईली तयार करून कोट्यवधी रूपयांचे कर्ज उचलले. यामध्ये १८ कजर्दारांच्या नावे तर बनावट फर्म तयार करून प्रत्येकी ५५ ते ६० लाख रूपयांचे कर्ज वाटप केले. काही कर्जदारांना तर लाखो रूपयांचे ओव्हरड्राप दिले. वसंतदादा बँकेच्या तत्कालिन संचालकांनी डीडीआर यांना या संदर्भात निवेदन दिले असून या सर्व घोटाळ््याला विजय दंडनाईक जबाबदार असल्याचे म्हटले आहे. या कर्जदारांच्या खात्यावर कर्जाची रक्कम जमा होताच त्यातील काही कर्जदारांच्या रकमा तत्कालिन चेअरमन विजय दंडनाईक यांच्या खात्यावर ट्रान्सफर झाल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाले आहे. या उचललेल्या कर्जाची परतफेड केली नाही. परिणामी ठेवीदारांच्या कोट्यवधी रूपयांच्या ठेवी अडचणीत आल्या. रिझर्व बँकेंच्या अधिका-यांनी बँकेची तपासणी केल्यानंतर गंभीर बाबी समोर आल्या. रिझर्व बँकेने त्यावेळी जिल्हा उपनिबंधकांना संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. तरीही संबंधित अधिका-यांनी जाणिवपुर्वक दुर्लक्ष करून गुन्हे दाखल केले नाहीत.

ठेवीची मुदत संपूनही ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदार हवालदिल झाले. त्यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन वसंतदादा बँकेच्या पदाधिकारी व कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी हे प्रकरण चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक संतोष शेजाळ यांनी सखोल चौकशी व तपास करून २८ जुलै २०२३ रोजी बँकेच्या संबंधितांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR