बुलडाणा : मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून दिवाळीच्या मध्यरात्रीला प्रवास करणा-या एका चालत्या ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे या महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार बघायला मिळाला.
चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच ट्रक रस्त्याच्या कडेला लावल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी या आगीत ट्रक आणि त्यामध्ये असलेल्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
लाखो रुपयांच्या साड्यांची राख रांगोळी
दिवाळीच्या फटाक्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यात अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशीच एक घटना रविवारी मध्यरात्री घडली. मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा तालुक्यातील वडी गावा नजिक चालत्या ट्रकने अचानक पेट घेतला. आर्को ट्रान्सपोर्ट कंपनीचा हा ट्रक असून तो सुरतहून नागपूरकडे निघाला होता. ट्रकमध्ये असलेल्या लाखो रुपयांच्या साड्या जळून खाक झाल्या आहेत.