27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeधाराशिवमशालीच्या स्वागतासाठी तुतारी सज्ज, पण घड्याळासाठी बाण रुसलेलाच...

मशालीच्या स्वागतासाठी तुतारी सज्ज, पण घड्याळासाठी बाण रुसलेलाच…

प्रतिनिधी : सतीश टोणगे

विवाह सोहळ्यात पाहुण्यांच्या स्वागतासाठी तुतारी वाजवण्याची प्रथा होती. राजवाड्यात नेहमी तुतारीची धून ऐकू यायची. परंतु कालांतराने मात्र तुतारी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर होती. तुतारी वाजवणे ही सुद्धा एक कला आहे, ते कोणालाही जमत नाही. तुतारी वाजवताना गाल फुगवावे लागतात, बेंबीच्या देठापासून ती फुंकावी लागते, तरच त्यातून आवाज येतो. तुतारी वाजवणारी काही मोजकीच मंडळी आहे, त्यांनाही अगोदर सांगून ठेवावे लागते, विक्री करणारे व्यापारीही मोजकेच होते. राज्यात आता तुतारीला विशेष महत्त्व आले आहे.

तुतारी फुंकणा-या तरुण वर्गाला चांगली आर्थिक मिळकत होऊ लागली आहे. तुतारी, मशाल धरण्यासाठी लागणारे ‘हात’ही सोबत आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला ‘तुतारी’ चिन्ह मिळाले आणि रातोरात ‘तुतारी’ घराघरांत गेली, ‘एक तुतारी द्या मज आणुनी…’ ही केशवसुतांची कविता सगळ्यांच्या ओठी आली व सोशल मीडियावर फिरू लागली.

आई जगदंबेची ‘मशाल ’ नवरात्रात घटस्थापनेच्या साठी लागत असते, जागरण गोंधळासाठी मशालचा उपयोग केला जात होता, पण यालाही राजकीय पक्षा त सामील केल्याने,याचाही विक्रमी खप झाला. कोणाला कधी दिवस येतील हे सांगता येत नाही. ‘नसानसात पुन्हा पेटवू, ठिणगी ही स्वाभिमानाची, पेटवू या ‘मशाल क्रांतीची’ ही मिलिंद डोबाळे देशमुख यांची कविता आठवल्याशिवाय रहात नाही. सध्या तरी तुतारी आणि मशाल चर्चेत असून, धाराशिव जिल्ह्यात मात्र कमळाबाई व घड्याळावर बाण रुसलेला दिसत असल्याने, बाण भात्यातच आहे. धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, येथे पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे उमेदवारी मागत होते, परंतु येथील उमेदवारी अजित पवार यांच्या गटाला गेल्याने, शिंदे सेना मात्र गप्प आहे. त्यामुळे याचा फायदा ठाकरे गटाचे ओमराजे यांना होऊ शकतो. त्यामुळे मशाल पेटवण्यासाठी तुतारी जोरात फुंकली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR