26.4 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रसुषमा अंधारे यांनी ट्वीट केलेल्या व्हीडीओमुळे राजकारणात खळबळ

सुषमा अंधारे यांनी ट्वीट केलेल्या व्हीडीओमुळे राजकारणात खळबळ

पुणे : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ‘एक्स’वर (ट्वीटर) एक व्हीडीओ ट्वीट केला आहे. या व्हीडीओत पोलिसांची एक गाडी दिसत आहे. या गाडीत कैद्यांना काहीतरी पाकिटे दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुषमा अंधारे यांनी या व्हीडीओवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. कोर्टातून येरवडा कारागृहात कैद्यांना घेऊन जाणा-या पोलिसांच्या गाडीत कैद्यांना पाकिटे वाटल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. ‘‘उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली. पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली’, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. हा व्हीडीओ पुण्यातील जेल रोडचा आहे, असे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले आहे.

‘‘कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? मग हळूच निर्जनस्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकीटं पुरवली जात आहेत?’’, असा सवाल सुषमा अंधारे यांनी ट्वीटमध्ये केला आहे. सुषमा अंधारे यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ‘देवेंद्र फडणवीस गृहखाते सांभाळण्यात अपयशी ठरले आहेत. तुम्हाला संभाळता येत नसेल तर राज्याचं गृहखातं माझ्याकडे द्या’, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

राज्याचे गृहखाते काम करण्यासाठी कमी : धंगेकर
सुषमा अंधारे यांच्या ट्वीटवर काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पोलिस पैसे घेत आहेत हे काय नवीन नाही. राज्याचे गृहखाते काम करण्यासाठी कमी पडत आहे. यांची भाषणं खोटी आणि आश्वासने देखील खोटीच’, अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी केली.

जेलमध्ये बसलेल्या बगलबच्च्यांसाठी सुविधा : नाना पटोलेंची टीका
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली. ‘‘सुषमा अंधारे यांनी काही नवीन ट्वीट केलेलं नाही. जेलमध्ये बसलेल्या बगलबच्च्यांसाठी सुविधा मिळत आहे. हे फक्त येरवडाबद्दल नाही. हे गुन्हेगार आणि माफिया यांना संरक्षण देणारं सरकार आहे’’, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची व्हीडीओवर प्रतिक्रिया
सुषमा अंधारे यांच्या ट्वीटवर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली.
राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ‘मी तो व्हीडीओ पाहिला नाही. त्यांनी तो पोलिस महासंचालकांना द्यावा. ते त्यावर कारवाई करतील’, असे शंभुराज देसाई म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘काही लोकांची सवय आहे, मोठ्या लोकांवर बोलले की माणूस मोठा होतो म्हणून आरोप केले असतील’, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR