नांदेड : प्रतिनिधी
शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावत विमानतळ गुन्हेशोध पथकाने ३ आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेले २ मोबाईल जप्त करण्यात आले असून, या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीविरोधातील पोलिसांच्या तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
३१ जुलै २०२६ रोजी रात्री एलआयसी कार्यालयाच्या पाठीमागे, महाराणा प्रताप चौक परिसरात फियार्दी दुचाकीवरून जात असताना ३ अज्ञात इसमांनी त्यांना अडवून दगडाने मारहाण केली. त्यानंतर फियार्दीजवळील सॅमसंग गॅलेक्सी एस-२४ मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. याच परिसरातील आणखी एका नागरिकाचाही रेडस्रमी कंपनीचा मोबाईल जबरीने लुटण्यात आला होता. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अल्पावधीत आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे प्रतीक हरीष सोनटक्के (वय २३), राहुल अशोकराव थोरात (वय २२) आणि प्रशिक देवानंद श्रावणे (वय १९) अशी असून, सर्वजण राजीव गांधी शाळेमागे, बालाजीनगर, येथील रहिवासी आहेत. आरोपींकडून अंदाजे १४ हजार रुपयांचा मुद्देमाल, त्यामध्ये एक सॅमसंग गॅलेक्सी एस-२४ आणि एक रेडमी कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
















