तिरुवनंतपुरम : काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी राजस्थान सरकारने गरिबांसाठी सुरू केलेल्या आरोग्य कार्यक्रमाचे कौतुक केले आहे. त्यांनी सांगितले की, जर काँग्रेस पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जिंकला तर असे कार्यक्रम संपूर्ण देशात राबवले जातील. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, राहुल गांधी यांनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघ वायनाडमध्ये एका कार्यक्रमादरम्यान हे वक्तव्य केले आहे. ते सध्या वायनाडच्या दौऱ्यावर आहेत.
राष्ट्रीय स्तरावर आरोग्य सुविधांचे पुनर्मूल्यांकन करण्याच्या गरजेवर भर देताना राहुल गांधी म्हणाले की, केंद्र सरकारने गरीब जनतेला त्यांचा मूलभूत अधिकार म्हणून वाजवी दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मला वाटते की राष्ट्रीय स्तरावर आपण आरोग्यसेवेबद्दल ज्या पद्धतीने विचार करतो त्याचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे.
ते म्हणाले की, माझा विश्वास आहे की केंद्र सरकारने आरोग्य सुविधा विशेषत: गरिबांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आपण याबाबतीत विचार केला पाहिजे. याची हमी देतो. आम्ही राजस्थानमध्ये यावर काही काम केले आहे आणि आशा आहे की आम्ही २०२४ मध्ये केंद्रात सत्तेवर आलो तर आम्ही अशा सुविधा देशभरात लागू करण्याचा प्रयत्न करू.