हैदराबाद : राजस्थानमध्ये निश्चितपणे पायंडा बदलणार असून यंदा पुन्हा काँग्रेसचे सरकार सत्तेत कायम राहणार आहे. संभाव्य मुख्यमंत्रिपदावरून कोणताही वाद राजस्थानमधील नेत्यांमध्ये नाही. निवडून आलेले आमदार नेता निवडतील आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठी त्यावर शिक्कामोर्तब करतील, असे मत माजी उपमुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
येत्या ३० नोव्हेंबरला होणा-या तेलंगण विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी पायलट सध्या हैदराबाद येथे आले असून ते पत्रकारांशी संवाद साधत होते. गेल्या ३० वर्षांपासून राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी अदलाबदल होत आहे. परंतु यावर्षी तसे काहीही होणार नाही. राजस्थान सरकारने राबविलेल्या योजनांचा परिणाम व फायदा लोकांना झाला आहे. त्यामुळे सर्व सर्वेक्षणात व पक्षाच्या पाहणीत सुद्धा राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्रिपदावर वाद नाही
मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबद्दल पायलट म्हणाले, मुख्यमंत्रिपदावरून कोणताही वाद नाही. काँग्रेसमध्ये नेता निवडीची एक प्रथा आणि परंपरा आहे. त्यामुळे निवडून आलेल्या आमदारांची बैठक होते. या बैठकीत आमदारांचे मत जाणून घेतले जाते. त्याची माहिती पक्षश्रेष्ठीला दिली जाते. त्यानंतर नेता निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. हा निर्णय सर्वांना मान्य असतो. त्यामुळे कोणताही वाद होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तेलंगणात काँग्रेसची हवा
तेलंगणात काँग्रेस सत्तेवर येणार असून मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने लोकांमध्ये असंतोष आहे. तेलंगणात सर्वाधिक बेरोजगार आहेत. काँग्रेसने दिलेल्या हमी लोकांना भावत असल्याने लोकांचा प्रतिसाद अभूतपूर्व असल्याचा दावा त्यांनी या वेळी केला.