मुंबई : राज ठाकरेंनी साद दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. शरद पवार आणि अजित पवार बैठकीच्या निमित्ताने भेटताना दिसले आणि राज्यात पुन्हा चर्चांना उधाण आले. ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या विधानांचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. याच सगळ्या राजकीय परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका मुलाखतीत ठाकरे बंधू आणि पवार काका-पुतण्या यांच्या पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. राज्यात पुन्हा काही राजकीय आघाड्या होताना तुम्हाला दिसत आहेत का? कारण दोन-तीन दिवसांपूर्वी आपण बघितले की, राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. पुण्यात शरद पवार-अजित पवार भेटले. हे राजकीय आघाडी होत आहे तुम्हाला दिसत आहे का? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माझी पहिली भूमिका कुठलेही परिवार एक होत असतील, तर आम्हाला त्याची अडचण नाही. त्यांनी जरूर एकत्रित यावे. आम्ही त्यांच्या एकत्रित येण्याचे स्वागत करू.
दुसरे, माध्यमे फार जास्त ऐकतात. फार जास्त विचार करतात आणि फार जास्त संदर्भ काढतात. दोन वाक्यांमधील अर्थ काढणे, हे जेवढं तुम्ही करता. मला असं वाटतं की, फार पुढचा विचार तो असतो. आतातरी मी स्पष्टपणे सांगतो. काय जे चाललेलं असेल… आतातरी अशा प्रकारच्या रिअलाईमेंटची मला कुठलीही परिस्थिती दिसत नाही. अर्थात साद आणि प्रतिसाद ज्यांनी दिला, असे तुम्ही म्हणत आहात. ते याबद्दल अधिक सांगू शकतील. मी त्याबद्दल अधिक सांगणं योग्य नाही. त्यामुळे हा मुद्दा तुम्ही त्यांनाच विचारा असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तुम्ही एक लक्षात ठेवा, जे तुम्ही करता (अर्थ काढता) ते कधीच होत नाही. एवढा तर तुम्ही अनुभव घ्या २०१९ पासूनचा असा चिमटा मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढला.