परभणी : उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड- हडपसर-नांदेड विशेष गाडीच्या १२ फे-या मंजूर केल्या आहेत. ही गाडी परभणी, छ. संभाजीनगर, अहमदनगर मार्गे धावणार आहे. या गाडीत वातानुकुलीत आणि स्लीपर मिळून २२ डबे असणार आहेत.
नांदेड ते हडपसर साप्ताहिक विशेष गाडीच्या ६ फे-या होणार आहेत. गाडी क्रमांक ०७६२३ हुजूर साहिब नांदेड ते हडपसर विशेष गाडी दिनांक २२, २९ मे आणि ५, १२, १९ आणि २६ जूनला दर बुधवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून रात्री ९ वाजता सुटणार आहे. ही रेल्वे परभणी, छ. संभाजीनगर, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन मार्गे हडपसर येथे दुस-या दिवशी सकाळी ११.२० वाजता पोहोचेल. ही गाडी मे आणि जून महिन्यात मिळून ६ फे-या पूर्ण करेल.
हडपसर ते नांदेड साप्ताहिक विशेष गाडीच्या ६ फे-या होणार आहेत. गाडी क्रमांक ०७६२४ हडपसर ते हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी दिनांक २३, ३० मे आणि ६, १३, २० आणि २७ जूनला दर गुरुवारी हडपसर रेल्वे स्थानकावरून दुपारी ३.१५ वाजता सुटेल आणि दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, मनमाड, छ. संभाजीनगर, परभणी मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे दुस-या दिवशी सकाळी ४.३० वाजता पोहोचेल. ही गाडी मे आणि जून महिन्यात मिळून ६ फे-या पूर्ण करेल. या विशेष गाडीचा उन्हाळी सुटीत प्रवास करणा-या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे प्रवाशात समाधान व्यक्त होत आहे. या विशेष गाडीचा लाभ घेण्याचे आवाहन नांदेड रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे.