नवी दिल्ली : नोएडा प्राधिकरणाच्या गेटवर नुकसान भरपाईच्या मागण्यांसाठी आंदोलन करणा-या शेतक-यांनी आज दिल्लीच्या दिशेने मोर्चा काढला. शेतक-यांच्या निषेध मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली-नोएडा, चिल्ला सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नोएडा आणि ग्रेनोमध्ये आजपासून कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
नोएडा प्राधिकरणाविरोधात जवळपास ६० दिवसांपासून शेतकरी संपावर बसलेले होते. उत्तर प्रदेशातील शेतक-यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्ली-नोएडा चिल्ला सीमेवरून संसदेकडे मोर्चा काढला आहे. नोएडा ते दिल्लीचा मार्ग शेतक-यांनी रोखला आहे.
महामाया उड्डाणपुलाखाली हजारो शेतकरी जमले. हजारो शेतकरी दिल्लीला जाण्याच्या प्रयत्नात आहेत. दिल्ली-नोएडा सीमेवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. नोएडा आणि दिल्लीतील अनेक मार्गांवर वाहतुकीवर परिणाम होत आहे. त्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
डीआयजी, अॅड. सीपी (एल अँड ओ), शिवहरी मीणा म्हणाले, कलम 144 लागू करण्यात आले आहे आणि सर्व सीमा २४ तासांसाठी सील करण्यात आल्या आहेत. सर्व सीमेवर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
लोकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा वाढवण्यात आली आहे.आम्ही शेतक-यांशी बोलत आहोत, सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे.