मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आरोपीने खंडणीसाठी पाच ते सहा ईमेल पाठवले होते. आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी १९ वर्षांच्या आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी तेलंगणामधून आरोपीला अटक केली असून गणेश रमेश वनपारधी असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने शादाब खान नावाने अंबानी यांना मेल पाठवला होता. या ईमेलमध्ये आधी २० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. नंतर यात वाढ करुन ४०० कोटी रुपये करण्यात आली. याआधी पाठवण्यात आलेले ईमेसाठी वीपीएन नेटवर्कचा वापर करण्यात आला होता, आणि याचा पत्ता बेल्जियमचा होता.
एशियातले सर्वात श्रीमंत आणि जगातल्या टॉप टेन श्रीमंतांच्या यादीत असलेल्या मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या अधिकृत ईमेल आयडीवर २७ ऑक्टोबरला धमकीचा पहिला ईमेल आला होता. या ईमेलमध्ये २० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती, खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर २८ ऑक्टोबरला धमकीचा दुसरा ईमेल पाठवण्यात आला. पण यात खंडणीची रक्कम वाढवून दोनशे कोटी रुपये करण्यात आली. दुसऱ्या ईमेलच्या तीन दिवसांनंतर म्हणजे ३० ऑक्टोबरला पाठवण्यात आला. यात खंडणीची रक्कम थेट ४०० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली होती. एकामागोमाग एक धमकीचे ईमेल आल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले होते.