बंगळुरू : बेंगळुरूमधील किमान २८ शाळांना शुक्रवारी सकाळी ईमेलद्वारे ‘बॉम्बस्फोटाची धमकी’ मिळाल्यानंतर त्या त्वरित रिकामी करण्यात आल्या. सुरुवातीच्या अहवालात केवळ १५ शाळांना ईमेल मिळाल्याचे सांगण्यात आले होते, मात्र आता ही संख्या २८ झाली आहे. या शाळांना सकाळी सातच्या सुमारास एक ईमेल आला ज्यामध्ये शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर ज्या पालकांनी आपल्या मुलांना शाळेत सोडले होते, त्यांना शाळा व्यवस्थापनाने फोन करून मेसेज करून पुन्हा शाळेत बोलावण्यात आले.
बेंगळुरूचे पोलिस आयुक्त बी दयानंद यांनी माध्यमांना सांगितले की, ही बॉम्बची धमकी खोटी होती. आम्ही सर्व शाळांमध्ये आमची टीम पाठवली आहे. आयुक्त दयानंद यांनी सांगितले की, २०२२ मध्येही दक्षिण बेंगळुरूमधील १५ शाळांना बनावट मेल पाठवण्यात आला होता. नंतर आरोपी पकडला गेला. मात्र, यावेळी ज्या शाळांना धमकीचे ईमेल पाठवले गेले ते उत्तर बेंगळुरूमध्ये आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी लोकांना घाबरू नका असे आवाहन केले आणि म्हणाले की, मी नागरिकांना घाबरू नका असे आवाहन करतो. आमचे पोलीस काम करत आहेत. ‘आपण सतर्क राहण्याची गरज आहे.