२०१५ च्या विश्वकप स्पर्धेची उपान्त्यपूर्व फेरी आणि २०१९ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची उपान्त्य फेरी गाठणारा ‘बांगला टायगर’ गतप्राण झाला असला तरी त्याचा बंधू ‘पाक टायगर’ अजून जिवंत आहे. त्याच्या अंगात अजूनही धुगधुगी आहे. तसा तो अजूनही व्हेंटिलेटरवर आहे. थोड्या वेळापुरते व्हेंटिलेटर काढण्यात आले इतकेच! पाक टायगरचा छोटा बंधू इतक्या लवकर स्पर्धेबाहेर जाईल असे वाटले नव्हते. पण जाता जाता या संघाने पुढील वर्षी पाकिस्तानात होणा-या चॅम्पियन्स स्पर्धेतील आपला सहभाग निश्चित केला आहे. सध्या सुरू असलेल्या विश्वकप स्पर्धेतील पहिल्या सात क्रमांकाचे संघ पाकमधील स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
कोलकात्यात मंगळवारी झालेल्या सामन्यात बांगला देशने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणे पसंत केले पण चांगली धावसंख्या उभारण्यात त्यांना अपयश आले. शाहीन आफ्रिदी आणि हॅरीस रौफसमोर बांगलाची अवस्था ३ बाद २३ अशी झाली. लिटन दास, शाकीब अल हसन आणि महमदुल्ला या बुजुर्ग खेळाडूंनी संघाला दोनशेचा पल्ला गाठून दिला पण तो पुरेसा नव्हता. शाकीब पुन्हा एकदा शॉर्ट बॉलच्या जाळ्यात सापडला. कसलेला फलंदाज मुशफिकर स्वस्तात बाद होणे बांगला संघाला भोवले. लिटन दास आणि महमदुल्लाने ७९ धावांची भागीदारी केली तेव्हा बांगलाची धावसंख्या भरारी घेणार असे वाटले होते. महमदुल्लाने ५६, लिटन दासने ४५, शाकीबने ४३ धावांचे योगदान दिले. शाहीन आणि वसिम ज्यु. ने प्रत्येकी तीन बळी घेतले. शफिक ६८ आणि फखर झमानने १२७ चेंडूत १२८ धावांची झन्नाट सलामी दिली तेव्हा २०५ धावांचे लक्ष्य टेकडीसारखे भासले. शफिक ६९ चेंडूत ६८ धावा काढून बाद झाला.
फखरला सूर गवसणे पाकसाठी महत्त्वाचे होते. अखेर त्याला सूर गवसला परंतु त्याला खूप उशीर झाला असेच म्हणावे लागेल. आता पाकचे केवळ तीन सामने उरले आहेत. इतके दिवस तो ‘सूर ना सजे क्या गाऊँ मै’असे गात बसला होता. ‘बैल गेला अन् झोपा केला’ दुसरे काय! फखरने ७४ चेंडूत ३ चौकार अन् ७ षटकारांसह ८१ धावा काढल्या. तोच सामनावीर ठरला. रिझवान (२६) आणि इफ्तिखारने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. पाकने ७ गडी राखून सामना जिंकला. मरगळलेल्या पाक संघाच्या चेह-यावर हास्याची लकेर पसरली. फार काळ ते जगतील असे वाटत नाही तरीही ‘टायगर अभी जिंदा है’ असे म्हणता येईल.