नवी दिल्ली : टॉयलेट क्लीनरच्या बाटलीवरून देशातील दोन बड्या कंपन्या आमने सामने आल्याचे सांगितल्यास तुम्हाला खरे वाटणार नाही, पण हे खरे आहे. टॉयलेट क्लीनरच्या बाटलीवरून हार्पिक आणि गोदरेज या कंपन्या समोरा-समोर आल्या असून सदर प्रकरण सुप्रिम कोर्टात पोहोचले आहेआहे. घराघरातील टॉयलेटमध्ये दिसणारी आणि वापरल्यानंतर कच-यात फेकली जाणारी टॉयलेट क्लीनरची बाटली दोन कंपन्यांमध्ये ओळखीचा मुद्दा बनली आहे.
त्याचे झाले काय की, निळ्या रंगाची आणि वरून एका बाजूने वाकलेली लाल झाकण असलेली हार्पिकची टॉयलेट क्लीनरची बाटली तुम्ही पाहिली असेलच. आता या हार्पिकच्या टॉयलेट क्लीनरच्या बाटलीच्या डिझाइनशी मिळत्या जुळत्या डिझाईनच्या बाटलीमधून गोदरेजनेही स्पाईक नावाचे टॉयलेट क्लीनर बाजारात आणले. यावरूनच दोन्ही कंपन्यांमध्ये वाद झाला आणि हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. दरम्यान, हार्पिक आणि गोदरेज या दोन्ही कंपन्या आपापली डिझाईन ही आपली अस्सल डिझाईन असल्याचे सांगून आमने सामने आल्या आहेत.
या वादामधून ट्रेडमार्क आणि डिझाईनच्या कॉपीराईटबाबतचा प्रश्न उपस्थित झाला आहे. हार्पिकची मूळ कंपनी असलेल्या रेक्कीट बेन्कीसरने मानेकडे वाकलेली डिझाईन असलेली बाटली लॉन्च केली होती. ही कंपनी १९८४ पासून आपले प्रॉडक्ट विकत असून २००२ साली आपली डिझाईन रजिस्टर केली होती. त्याचा क्रमांक १९१२९१ हा आहे. तर दुसरीकडे गोदरेजनेही आता स्पाईक नावाचे टॉयलेट क्लीनर बाजारात आणले आहे.

