मुंंबई : खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीत महाराष्ट्रातील सर्व नवनिर्वाचित आमदारांना आज रात्री घरी स्रेहभोजनाचे निमंत्रण दिले आहे. यामध्ये भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार दिल्लीला जाणार नसल्याची माहिती दिली आहे.
विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी दिल्लीमध्ये प्रशिक्षण शाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विधीमंडळी सचिवालयाकडून ही प्रशिक्षण शाळा आयोजित करण्यात आली आहे. या प्रशिक्षण शाळेसाठी महाराष्ट्रातील सर्व नवनिवार्चित आमदार दिल्लीत दाखल झाले आहेत. श्रीकांत शिंदे यांनी या नवनिर्वाचित आमदारांसाठी आज रात्री दिल्लीतील घरी स्रेहभोजनाचे निमंत्रण दिले आहे.
श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाच्या १० आमदारांना देखील स्रेहभोजनाचे निमंत्रण दिल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून सिद्धार्थ खरात, गजानन लवाटे, संजय देरकर, अनंत (बाळा) नर, हरुन खान, वरुण सरदेसाई, महेश सावंत, मनोज जामसुतकर, बाबाजी काळे, प्रवीण स्वामी हे १० नवनिवार्चित आमदार आहेत. यातील बाबाजी काळे, वरूण सरदेसाई, गजानन लवाटे हे ३ आमदार आपल्याच मतदारसंघात असल्याने प्रशिक्षण शाळेसाठी दिल्लीला गेले नाहीत. तर उर्वरित ७ आमदार दिल्लीत आहेत.
आम्हाला निमंत्रण नाही : उबाठा
ठाकरे गटाच्या सर्व नवनिवार्चित आमदारांनी श्रीकांत शिंदेंचे स्रेहभोजनाचे निमंत्रण नाकारल्याचे समजते. कोणीही स्रेहभोजनासाठी जाणार नसल्याचे माहिती मिळत आहे. तर काही आमदारांनी आपल्याला निमंत्रण मिळाले नसल्याचे म्हटले आहे. एकत्रितरित्या कोणीही स्रेहभोजनाला जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.