अहिल्यानगर : प्रतिनिधी
दिवाळीच्या सणाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन तरुणांवर काळाने घाला घातल्याची मन हेलावून टाकणारी दुर्घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे. जिल्ह्यातील शेवगाव-पैठण रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ऊसाच्या भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे खानपूर गावावर आणि संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खानपूर येथील तीन तरुण दिवाळीच्या खरेदीसाठी आपल्या दुचाकीवरून शेवगावच्या दिशेने निघाले होते. ते घोटण गावाजवळ आले असता, एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव उसाच्या ट्रकचालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटले. या अनियंत्रित ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की,तिघांचा जागीच मृत्यू झाला.
मृत तरुणांची नावे:
या अपघातामध्ये प्राण गमावलेल्या तरुणांमध्ये एका १९ वर्षीय तरुणासह दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. मृतांची नावे ओंकार जगधने, अमर जगधने आणि रोहित धनुरे (सर्व रा. खानपूर) अशी असल्याचे समोर आले आहे.
दिवाळीसारख्या आनंदाच्या सणाच्या तोंडावर एकाच गावातील तीन तरुण अपघातात मृत्यूमुखी पडल्यामुळे खानपूर गावावर आणि मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती, तर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
















