37.7 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रतूरडाळीचे दर वाढणार?

तूरडाळीचे दर वाढणार?

स्वयंपाकघराचे ‘बजेट’ कोलमडणार

नागपूर: प्रतिनिधी
साखर, धान्य, तांदूळ, खाद्यतेलापाठोपाठ आता तूरडाळ, कडधान्य, मूग आणि उडीद डाळीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे वरणभात, कडधान्यांची उसळ करताना गृहिणींना विचार करावा लागणार आहे. ठोक बाजारात सध्या तूरडाळ १६५ रुपये किलो तर किरकोळ बाजारात १८० ते १८५ रुपये किलो आहे. मात्र, येत्या दोन महिन्यांत तूर डाळ २१० ते २२० रुपयांवर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या दरवाढीमुळे ‘किचन बजेट’ मात्र कोलमडून जाणार आहे.

सलग दोन वर्षांपासून तुरीला अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. त्यामुळे तूर डाळीचे भाव सतत वाढत असून ग्राहकांचा खिसा रिकामा होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर खाद्यतेलासह डाळीचे भाव कमी ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठे प्रयत्न झाले होते. मात्र, त्याला ब्रेक लागला आहे. कारण पाम तेल उत्पादक देश असलेल्या इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यात शुल्कात वाढ केली आहे. तसेच तूर डाळीचे उत्पादन पावसामुळे कमी झाल्याने दरात सतत वाढ होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तूर डाळ ४० टक्के वाढलेली आहे.

मूगडाळीचा शिरा महागणार
तूरडाळी पाठोपाठ मूगडाळीचे दरही वधारले आहेत. मुगाची डाळ ठोक बाजारात १०८ ते १२२ रुपये किलो या दराने विक्री होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात एक किलो मूगडाळीसाठी ग्राहकांना १४० ते १४५ रुपये मोजावे लागत आहेत. तसेच उडीद मोगरचे भावही वाढले असून प्रतिकिलो ठोक बाजारात १३०ते १३६ रुपये भाव असून किरकोळ बाजारात १५० रुपयांवर गेली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR