पुणे : खरीप हंगामात तुरीसह अन्य कडधान्यांच्या लागवडीत झालेली घट आणि कडधान्यांच्या काढणीच्या वेळी बसलेला अवकाळीचा फटका, यामुळे देशात तूर आणि मुगाच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. तसेच आयात केलेली तूर ग्राहकांच्या पसंतीस उतरत नसल्यामुळे किरकोळ बाजारात तूरडाळीचे दर १६० ते २०० रुपयांवर गेले आहेत.
खरीप हंगामातील तूर बाजारात येऊ लागली आहे. तुरीला २०२४ साठी केंद्र सरकारने सात हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. पण नव्या तुरीची आवक होताच बाजारातील दर सरासरी नऊ ते १० हजार रुपये प्रति क्विंटलवर गेले आहेत. काढणीच्या वेळी तूर पावसात भिजल्यामुळे दर्जा घसरला आहे. खरेदी केलेली तूरडाळ मिल्समध्ये प्रक्रियेसाठी नेल्यानंतर उता-यात घट दिसून येत आहे.
एक क्विंटल तुरीपासून जेमतेम ६० ते ७० किलो तूरडाळ तयार होत आहे, तीही अपेक्षित दर्जाची नसते. एक किलो तुरीपासून तूरडाळ तयार करण्याचा खर्च साधारण ३० ते ४० रुपये आहे. प्रति क्विंटल सरासरी दहा हजार रुपयांनी खरेदी, प्रति क्विंटल चार हजार रुपये प्रक्रिया खर्च आणि उता-यात होत असलेली घट आदी कारणांमुळे तूरडाळीचे दर सरासरी १६० ते २०० रुपयांपर्यंत गेले आहेत, अशी माहिती कडधान्यांचे व्यापारी नितीन नहार यांनी दिली.
उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट
केंद्र सरकारने यंदा ३४.२१ लाख टन तूर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज आहे. साधारण ३० लाख टनांपर्यंत उत्पादन होण्याचा अंदाज आहे. पण, देशाची एक वर्षाची गरज ४६ लाख टनांची आहे. त्यामुळे वर्षभर तुरीची टंचाई आणि भाववाढीचा सामना करावा लागणार आहे. मुगाचे उत्पादन १४.०५ लाख टन आणि उडदाचे १५.०५ लाख टन होईल, असा सरकारचा अंदाज होता. त्यातही २५ टक्क्यांपर्यंत घटीचा अंदाज आहे.
केंद्राची बाजारभावाने खरेदी
केंद्र सरकार कोणत्याही शेतीमालाची हमीभावाने खरेदी करते. पण, तुरीच्या उत्पादनात घट होण्याच्या भीतीने सरकारने हमीभावाने नाही तर बाजारभावाने तूर खरेदी करण्याची घोषणा डिसेंबरच्या अखेरीस केली होती. ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’कडून ही खरेदी होणार आहे. खुल्या बाजाराचा आढावा घेऊन दररोज खरेदीचा भाव जाहीर करण्यात येणार आहे. केंद्र सरकार साधारणपणे दहा लाख टनांपर्यंत तूर खरेदी करू शकते. केंद्राच्या या घोषणेमुळेही तुरीच्या दरात तेजी आली आहे.