मुंबई : प्रतिनिधी
अशोक खरात प्रकरण आता केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित राहिलेले नाही. यात अनेक राजकीय नेत्यांची नावे आणि कनेक्शन्स समोर येत आहेत. अशोक खरात प्रकरणाने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाचे पडसाद दोन्ही शिवसेनेवर पडत असल्याचे दिसत आहेत.
शीतल म्हात्रे यांनी या प्रकरणात थेट ‘मातोश्री’ला खेचल्याने या वादाला आता नवीन वळण मिळाले आहे. शिवसेना शिंदे पक्षातील नेत्या शीतल म्हात्रे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत दावा केला की, अशोक खरात याच्या संस्थेला मिळालेली पाण्याची जोडणी ही ‘मातोश्री’वरून आलेल्या आग्रहाखातर देण्यात आली होती.
शीतल म्हात्रे यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली. म्हात्रे यांची ही धडपड ‘केविलवाणी’ असल्याचे म्हणत, विधान परिषदेच्या आगामी जागा मिळवण्यासाठी शिंदे गटातील नेत्या नीलम गो-हे आणि शीतल म्हात्रे या दोघीही स्वत:चे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी असे आरोप करत आहेत. या प्रकरणावरून शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष यांच्याकडून एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
अशातच शीतल म्हात्रे यांचे आणखी एक ट्वीट समोर आले आहे, ज्यात त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावर पलटवार केला आहे. यावेळी त्यांनी म्हटले की, ताई, उबाठाच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेली विधान परिषदेची जागा मिळवण्यासाठी ‘मातोश्री’च्या मॅडमची किती चापलुसी कराल? प्रियंका चतुर्वेदींची राज्यसभेची जागा घेण्याचा तुमचा डाव फसला.
आता थेट उबाठाच्या जागेवरच डोळा आहे की काय तुमचा? त्यातच आदू बाळाने गेल्या आठवड्यात गांजा राऊतची कॉलर धरली म्हणे ताई, खासदार-आमदार व्हायची स्वप्ने आता सोडून द्या. मॅडमच्या इशा-यावर तुम्ही कितीही नाचलात तरीही तुमच्या राजकीय जीवनातला अंधार काही दूर होणार नाही. दरम्यान आता नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रे यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
