छ. संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आंदोलन करत आहे. काही तरुणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.
मराठा आरक्षणासाठी आणखी दोन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. संगमनेर तालुक्यात एका तरुणाने आत्महत्या केली आहे. घराच्या मागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. सागर वाळे (वय २५) असे या तरुणाचे नाव आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
‘आम्ही जातो आमुच्या गावा आमचा रामराम घ्यावा’, आरक्षण नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे त्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
तर दुसरी घटना छत्रपती संभाजीनगर येथील आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील पोखरी गावातील एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. शुभम अशोक गाडेकर (रा. कोलठान) याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
पोखरी शिवारात मराठा आरक्षणासाठी झाडाला गळफास लावून २३ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. शुभम हा एमपीएससीची तयारी करत होता त्याच्या पश्चात एक मोठा भाऊ, आई-वडील हे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.