17.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी

उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

मुंबई (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. तेच आरक्षणाचे मारेकरी आहेत, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केला. मराठा आरक्षणावरून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली.

मराठा आरक्षणासाठी सर्व ४८ खासदारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषदेत केली होती. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. कारण मराठा समाजाबद्दल त्यांना किती संवेदना आहेत, हे मराठा समाज आणि आम्हालाही माहिती आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले आणि ते मुंबई उच्च न्यायालयात टिकले होते. हे आरक्षण टिकवण्याचे काम मी आणि देवेंद्र फडणवीसांनी केले; पण मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात गेले.

तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले होते. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष कोण होते, हे सर्वांना माहिती आहे. हेच खरे तर मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंना मराठा समाजावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही’’, अशी टीका शिंदे यांनी केली. उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाला भडकावण्याचे काम करू नये. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणार आरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे. इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देणार आहे. आरक्षणासाठी आमचे काम युद्धपातळीवर सुरू असल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पाया खालची वाळू सरकली आहे, अशी टीका त्यांनी केली.

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे. त्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे, न्यायमूर्ती भोसले आणि निवृत्त न्यायाधीश गायकवाड या तिघांची समिती नेमली आहे तसेच इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सूचना दिल्या आहेत. आमचे सरकार मराठ समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR