29.8 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रसर्व मंत्र्यांनी खासदारांनी राजीनामे द्यावेत, संसदेचे अधिवेशन बोलावावे

सर्व मंत्र्यांनी खासदारांनी राजीनामे द्यावेत, संसदेचे अधिवेशन बोलावावे

उद्धव ठाकरे यांची मागणी

मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारमधील महाराष्ट्रातल्या भाजपाच्या सर्व मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधानांसमोर आवाज उठवावा. तुम्ही सर्वसमावेशक आरक्षण देणार नसाल तर आम्ही तुमच्या मंत्रिमंडळात राहू इच्छित नाही, असे सांगून मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत. मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरही जर पंतप्रधानांवर काहीच परिणाम होणार नसेल महाराष्ट्रातील सर्वपक्षीय ४८ खासदारांनी एकत्र येत राजीनामे द्यावेत, असे आवाहन शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले.

राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका उडाला आहे. या पार्श्वभूमीवर ‘मातोश्री’ येथे पत्रकार परिषद घेऊन, जरांगे-पाटलांनी टोकाचे पाऊल उचलू नये. मराठा तरूणांनी आत्महत्या करू नयेत. आपापसांत मतभेद होतील, जाळपोळ, भांडणे होतील अशा गोष्टी टाळण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. आरक्षणाच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार काहीही भूमिका घेत नसल्याबद्दल टीकास्त्र सोडले. देशातील माणसे अस्वस्थ असतील तर पंतप्रधानांनी आपल्या देशात काय चालले आहे हे पाहणे त्यांचे कर्तव्य आहे. ते लक्ष देत नसतील तर महाराष्ट्रातील नितिन गडकरी, भागवत कराड, भारती पवार, कपिल पाटील, राववाहेब दानवे, पियुष गोयल या सर्व केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर राज्यातील चिघळलेला आरक्षणाचा विषय मांडला पाहिजे.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला मोरारजी देसाई सरकारने मुंबईत गोळीबार केला होता. त्या गोळीबारीच्या चौकशीला त्यांनी नकार दिला होता. तेव्हा चिंतामणराव देशमुख यांनी गोळीबाराची चौकशी करीत नाही याचा अर्थ तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आकस आहे. मला तुमच्या मंत्रिमंडळात राहायचे नाही, असे म्हणत राजीनामा दिला होता. त्याच प्रमाणे या सर्व मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या अस्वस्थेबद्दल पंतप्रधानांना पटवून दिले पाहिजे की, महाराष्ट्र पेटतोय. तेव्हा तुम्ही सर्वसमावेशक आरक्षण देणार आहात की नाही? देणार नसाल तर आम्ही तुमच्या मंत्रिमंडळात राहू इच्छित नाही, असे स्पष्टपणे सांगून राजीनामा दिला तरच हा प्रश्न सुटेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

संसदेचे अधिवेशन बोलवा
आरक्षणाचा प्रश्न हा लोकसभेत सोडवण्यासारखा आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारच्या बाजूने दिलेला निर्णय भाजपाने लोकसभेत पाशवी बहुमताच्या जोरावर कसा वळवला, हे सर्वांना माहिती आहे. यामुळे विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन हा प्रश्न सुटत असेल तर जरूर घ्या; पण त्या पेक्षा संसदेचे विशेष अधिवेशन घेऊन तात्काळ हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो, असेही ठाकरे म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. मग गादीवर बसल्यानंतर त्यांनी दीड वर्षांनी शपथ का घेतली? असा सवाल करीत आता स्वत:चे कपडे झटकून चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR