36.7 C
Latur
Thursday, March 26, 2026
Homeमहाराष्ट्रपुढचे चार दिवस ‘अवकाळी’चे संकट

पुढचे चार दिवस ‘अवकाळी’चे संकट

परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत हवामानात बदल

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात मार्च महिन्याच्या अखेरीस उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला असतानाच आता हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. प्रखर उन्हामुळे नागरिक त्रस्त झालेले असताना दुसरीकडे अवकाळी पावसाची चाहूल लागली आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागांत अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासोबतच ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे.

विशेषत: दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यातील परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ येथेही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांत गारपीटही झाली असल्याने शेतक-यांसमोर नव्या संकटाची स्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांत पावसाच्या सरी कोसळल्या असून काही ठिकाणी जोरदार वा-यांसह गारपीट झाल्याची नोंद आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतक-यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळे आधीच उष्णतेचा सामना करणा-या जनतेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

एका बाजूला ऊन आणि दुस-या बाजूला पाऊस
दरम्यान, काही भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार असल्याने हवामानाची ही दुहेरी स्थिती नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. एका बाजूला कडक ऊन आणि दुस-या बाजूला अचानक पाऊस व वादळी वारे यामुळे वातावरण अस्थिर झाले आहे. पुढील काही दिवस हवामानाचा हा अनिश्चित पॅटर्न कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR