36.9 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रऐन दिवाळीत राज्यात अवकाळीचे संकट

ऐन दिवाळीत राज्यात अवकाळीचे संकट

कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगलीत जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरू असताना आता त्यावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

मागील दोन दिवसांत मुंबईसह कोकणात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यातच आता कोकणासह मध्य महाराष्ट्रातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील २४ तासांत अनेक ठिकाणी जोरदार सरी बरसण्याचा अंदाज आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.

मुंबईत गुरुवारी सायंकाळी अचानक झालेल्या पावसाने चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच, दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहक, विक्रेत्यांचीही धावपळ झाली. मुंबईतील पश्चिम उपनगरे तसेच मध्य उपनगरात रात्री ८ नंतर अचानक पावसाने हजेरी लावली. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. पुढील २ दिवस मुंबईसह उपनगरात पावसाची शक्यता आहे.

कोकणातही दमदार पाऊस
मागील दोन दिवसांपासून कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसत आहे. पुढील दोन दिवसही या भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात पडत असलेल्या पावसामुळे आंबा पिकांवर मोठे संकट ओढवण्याची शक्यता आहे. मागील वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाही मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने शेतकरी देखील चिंतेत आहे.

मध्य महाराष्ट्रातही जोरदार पाऊस
मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात पुढील २४ तासांत दमदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अल-निनो वादळाच्या संकटामुळे यंदा मान्सून काळात अत्यल्प पावसाची नोंद झाली. त्यामुळे येत्या काळात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. अशावेळी आता अवकाळी पावसामुळे शेतक-यांची चिंता अधिक वाढली आहे.

विदर्भ, मराठवाडा कोरडाच
मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई विभागात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. याशिवाय पुढील २४ तासांत देखील दमदार पावसाचा अंदाज आहे. मात्र, तिकडे विदर्भ आणि मराठवाड्यात वातावरण कोरडेच असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR