मुंबई : प्रतिनिधी
भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये आज अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्या हस्ते सचिनच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी सचिन तेंडुलकर स्वत: उपस्थित होता. सचिनचा हा पुतळा तब्बल २२ फूट उंचीचा आहे.
क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणा-या सचिन तेंडुलकर याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सचिन तेंडुलकरचा पूर्णाकृती पुतळा त्याचा आयकॉनिक शॉट खेळतानाचा असून तो वानखेडे स्टेडियममधील सचिन तेंडुलकर स्टँडच्या जवळच उभारण्यात आला आहे. हा पुतळा प्रसिद्ध आर्टिस्ट प्रमोद कांबळे यांनी तयार केला आहे. सचिन तेंडुलकरने आपली दोन दशकांची देदिप्यमान कारकीर्द मुंबईच्या वानेखेडे स्टडियमवरच संपविली होती. त्याने १० वर्षांपूर्वी आपली शेवटची इनिंग त्याच्या होम ग्राऊंड वानखेडेवर खेळली होती.सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा आधीचा मुहूर्त हा त्याच्या वाढदिवसादिवशीच होता. मात्र पुतळ्याला अजून फिनिशिंग टच देण्यात आला नसल्याने ही तारीख पुढे ढकलण्यात आली.
मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये सचिनच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा शानदार सोहळा आज पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुतळ््याचे अनावरण करण्यात आले. नवीन खेळाडूंना त्याच्याकडे पाहून प्रेरणा मिळण्याच्या उद्देशाने हा पुतळा उभारण्यात आला. वानखेडेच्या ‘एमसीए’ लाउंजमध्ये हा सोहळा पार पडत आहे. या कार्यक्रमाला बीसीसीआयचे सचिव जय शाह, बीसीसीआय कोषाध्यक्ष आशिष शेलार, एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे उपस्थित होते. सचिनने वानखेडेवर मैदानावर अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
करिअरमधील शेवटची कसोटी वानखेडेवरच
२०१३ मध्ये सचिन तेंडुलकरने वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट करिअरमधील अखेरचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला होता. विशेष म्हणजे त्याचे हे होमग्राऊंड असल्याने येथे सचिनचा पुतळा उभे राहणे खरोखरच एक ऐतिहासिक घटना असून, हा पुतळा नव्या क्रिकेटरना कायम प्रेरणा देत राहणार आहे.
२०११ चा वर्ल्डकप
वानखेडेवरच जिंकला
वानखेडे मैदानावरच २०११ साली भारताने वनडेमधील दुसरा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर व्हिक्टरी परेडवेळी विराट कोहली आणि सुसूफ पठाणने सचिन तेंडुलकरला आपल्या खांद्यावर घेतले होते तर सचिनच्या हातात तिरंगा आणि चेह-यावर वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग असल्याचे समाधान होते. या निमित्ताने वानखेडेच्या अनेक आठवणी ताज्या झाल्या आहेत.