25.6 C
Latur
Wednesday, July 3, 2024
Homeमहाराष्ट्रपेपरफुटीवरून गदारोळ!

पेपरफुटीवरून गदारोळ!

फडणवीसांची उत्तरे विरोधकांचे असमाधान विक्रमी पदभरती झाल्याचे उपमुख्यमंत्र्यांचे विधान

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील घडलेल्या पेपरफुटी प्रकरणांचा मुद्दा सोमवारी पावसाळी अधिवेशनात सभागृहात चर्चेसाठी आला असताना चांगलाच गदारोळ पाहावयास मिळाला. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील पेपरफुटीच्या मुद्यांवरुन राज्य सरकारवर जोरदार आगपाखड केली.

त्याला प्रत्युत्तर देताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांना त्वेषाने प्रत्युत्तर दिले. पेपरफुटीबाबत घडले काय आणि काय नरेटिव्ह पसरवले जात आहे, यामध्ये मोठा फरक आहे. मला आता राजकारण करायचं नाही, नाहीतर मागच्या सरकारच्या काळात किती परीक्षेचे काय फुटले आणि कशाप्रकारे फुटले याची जंत्री मी आणली आहे. पण मी त्याबाबत बोलणार नाही. पण विरोधी पक्षाकडून अशाप्रकारची बेताल वक्तव्यं केली जातात तेव्हा तरुणांमध्ये गैरसमज पसरतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सरकारच्या काळात राज्यात विक्रमी नोकरभरती झाल्याचा दावाही केला. आपण ७५ हजार नोकरभरतीचे लक्ष्य ठेवले होते. आमचे सरकार आल्यानंतर ५७,४२२ नियुक्तीचे आदेश देण्यात आले. तसेच ज्यांची परीक्षा पूर्ण झाली, कागदपत्रे पूर्ण झाली अशांची संख्या १९८५३ इतकी आहे. ही एकूण संख्या ७७,३०५ इतकी आहे. ही सगळी पदे कुठल्याही घोटाळ्याविना भरली गेली. हा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. आणखी ३१,२०१ पदे भरण्याची प्रक्रियाही सुरु आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

कसा फुटला पेपर?
अंतिम रिपोर्टनुसार संबंधित विद्यार्थी १०० पैकी ४८ प्रश्नात पास आहे, बाकीची उत्तरे चुकली आहेत. पॅटर्नमधील काही उत्तर ख-या उत्तराशी जुळत असल्याने कारवाई केली आणि परीक्षा रद्द केली. त्यामुळे आपण नवीन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणात टीसीएस कंपनीने विद्यार्थ्यांची मोठी संख्या पाहता, काही ठिकाणी इतर केंद्र ताब्यात घेऊन परीक्षा घेतल्या. त्यापैकी एका केंद्रावर हा प्रकार घडला होता. मात्र, आगामी काळात परीक्षा या टीसीएस कंपनीच्या केंद्रांवरच होतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

तलाठी भरती का रद्द?
देवेंद्र फडणवीस यांनी तलाठी भरतीबाबतही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, तलाठी पेपरभरती पेपर फुटला नाही, उत्तराची पद्धत चुकली होती. त्यामुळे परीक्षा रद्द केली. उत्तर चुकले असेल तर समान मार्क दिले जातात, त्यावर ओरड झाली, त्यामुळे पेपर रद्द केला असे फडणवीस यांनी सांगितले.

रोहित पवार संतापले
रोहित पवार म्हणाले की, पेपर फुटीचा कायदा यावा यासाठी आम्ही आंदोलन केले, उपोषण केले आहे. महाराष्ट्र राज्य पेपरफुटीचा कायदा या अधिवेशनात काढणार का? सार्वजनिक भरतीचे पेपर फुटले आहेत. केंद्र सरकारने जो कायदा आणला त्याचे स्वागत आहे. त्यातही काही त्रुटी आहेत. या अधिवेशनात पेपर फुटीचा कायदा आणला जावा. हा युवकांच्या भवितव्याचा विषय आहे. आम्ही चुकीचं काही बोलत नाही. गृहमंत्री बोलत असताना त्यांच्याकडे जी माहिती आली ती अपुरी आहे असे सांगत त्यांनी सरकारवर टीका केली.

दोषींना १० वर्ष जेलमध्ये टाका : काँग्रेस
स्पर्धा परीक्षेत पेपर फुटी दिसून येते. तलाठी भरती झाली त्यात एकूण मार्कपैकी जास्त मार्क्स देण्यात आल्याचे दिसून येते. पेपर फुटीत कोट्यवधीचा भ्रष्टाचार होतो हे समोर आले. जे पेपर फुटीत आढळतील त्यांना १० वर्ष जेलमध्ये टाकलं पाहिजे. या प्रकरणात कुणीही उच्च पदस्थ असला तरी यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR