वॉशिंग्टन : इराण-इस्रायल युद्ध सुरु असताना अमेरिकेने इराणवर बंकर बस्टर बॉम्बने हल्ला केला होती. इराणच्या अनुप्रकल्पांवर हा हल्ला झाला होता. या मिशनला ऑपरेशन मिडनाईट हॅमर असे नाव देण्यात आले होते. मात्र आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑपरेशन मिडनाईट हॅमरदरम्यान, एक अमेरिकन बॉम्बर(लढाऊ विमान) बेपत्ता झाले आहे.
अमेरिकेचे हे बॉम्बर इराणवर बॉम्ब टाकण्यासाठी निघाले होते, मात्र ते अद्याप परतलेले नाही. इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे बॉम्बर पाडले तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एका विमानतळावर हे अमेरिकन बॉम्बर दिसले आहे, त्यामुळे असेही बोलले जात आहे की हे विमान सुरक्षित आहे. मात्र खरी परिस्थिती काय आहे ते कोणालाही माहिती नाही. काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की बी-२ बॉम्बर बेपत्ता आहे. त्यामुळे अमेरिकेच्या या गुप्त मिशनमुळे देशाला मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याचे बोलले जात आहे.
एका अहवालानुसार, ऑपरेशन मिडनाईट हॅमरसाठी निघालेले बी-२ बॉम्बर अद्याप अमेरिकन तळावर परतलेले नाही. या अहवालात असे म्हटले आहे की, ‘इराणवर हल्ला करण्यासाठी दोन गट तयार करण्यात आले होते, एका गटाचे काम इराणला फसवणे होते आणि दुस-याचे काम इराणवर हल्ला करणे होते. मात्र आता या दोन बॉम्बर्सच्या गटांपैकी एक परतलेला नाही अशी माहिती समोर आली आहे.
स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे बी-२ बॉम्बर्सला ट्रॅक करणे खूप कठीण आहे. त्यामुळे अशा विमानांना एअर डिफेन्स सिस्टीमने पाडता येत नाही. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होत आहे की बॉम्बर्स कुठे गेले? तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बी-२ बॉम्बर्सचा रेडिओ बंद असू शकतो, त्यामुळे त्याचे स्थान समजू शकत नाही. तसेच काहींनी असा संशय व्यक्त केला आहे की, अमेरिकेने एखाद्या गुप्त ठिकाणी हे बॉम्बर तैनात केलेले असू शकते.