30.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रपाणीटंचाईमुळे गावे तहानलेलीच,दुष्काळाच्या भयावह झळा

पाणीटंचाईमुळे गावे तहानलेलीच,दुष्काळाच्या भयावह झळा

माळशीरस : माळशिरस तालुक्यातील तरंगफळ येथून पुढे गेल्यावर भांब, पिंपरी, गीरवीसह गारवाड मगरवाडी, सुळेवाडी, बचेरी, शिंगोर्णी या गावांमध्ये सध्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत.

पण, किमान १० ते १२ दिवसातून एकदाच टँकर येतो. जनावरांसाठी वैरण नाही, प्यायला पाणी नाही, रस्ते नीट नाहीत, रोजगार नाही, मुलांसाठी आठवीपर्यंत शिक्षणाची सोय, आरोग्याची दर्जेदार सुविधा नाही, शाळा सुटल्यावर मुलांना अभ्यासापेक्षा पाण्याचीच चिंता, अशी स्थिती पाहून गावांमधील तरुणांनी (रंगकाम करणे) पुणे-मुंबईची वाट धरली आहे. या गावांमध्ये निवडणुकीपेक्षा दुष्काळाचा सामना कसा करायचा, हा प्रश्‍न आहे. पाणी प्रश्‍न सोडविणाऱ्या उमेदवाराला आमचे प्राधान्य राहील असा सूर या मतदारसंघात फिरता ऐकायला मिळाला.

मुख्य शहरांमध्ये जाण्यासाठी महामार्ग चकाचक झाले, पण गावांना जोडणारे अंतर्गत रस्ते अजूनही बिकटच आहेत. दवाखान्यात रुग्ण घेऊन जायचे म्हटले तर नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागतो, अशी वस्तुस्थिती आहे. या गावकऱ्यांना अजूनही रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण, पूर्णवेळ वीज अशा मूलभूत सोयींसाठीच संघर्ष करावा लागतोय. विजेची सोय आहे, पण २४ तास वीज ज्या दिवशी राहते तो त्यांच्यासाठी उत्सवाचा दिवस मानला जातो. दसूर गावातील नागरिकांसाठी पाणी आहे, पण शेतीसाठी पाणी नाही.

आता दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यात नीरेच्या उजव्या कालव्यातून कॅनॉलला पाणी सोडले आहे, पण अनेक गावांना आजही प्यायला पाणी नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे त्या गावांमधील नागरिकांमध्ये मतदान किंवा निवडणुकीचा उत्साह दिसत नाही. दुसरीकडे अकलूज, वेळापूर, खुडूस, तरंगफळ, झंजेवाडी अशी गावे प्रगतिशील असल्याचेही पाहायला मिळाले. माळशिरस विधानसभा मतदारसंघात खासदार, आमदारही बाहेरचा नको, असा सूर ऐकायला मिळाला. तर सुळेवाडीसह माळशिरस-सातारा सीमेवरील काही गावांमध्ये विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडूनही मतदारांना अपेक्षा आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या यादीत सध्या टँकर सुरु, पण, १२ ते १५ दिवसातून एकदाच येतो टँकर.स्वच्छ व पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही, जनावरांना पाणी, चारा नाही, नागरिकांवर पशुधन विकण्याची वेळ आली.

चांदापुरी येथून दोन दिवसातून एकदा विकत पाणी आणावे लागते . केंद्र व राज्य सरकारच्या बहुतेक योजना गावांपर्यंतच पोचल्याच नाहीत.पाऊस पडेल तेव्हाच पाणी असते, सध्या दुष्काळात विहिरी आटल्या असून तळ्यांनीही तळ गाठला.मगरवाडीत कधीतरीच २४ तास वीज असते. मगरवाडीतून पुढे सुळेवाडीला जाण्यासाठीचा रस्ता पाहिल्यावर पुन्हा तिकडे कोणी चुकूनसुद्धा फिरकणार नाही

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR