30.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रधुळ्यात वंचितला मोठा धक्का, अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद

धुळ्यात वंचितला मोठा धक्का, अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद

धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपने डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीकडून सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांना तिकिट देण्यात आले होते. मात्र अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज छाननीअंती बाद ठरवण्यात आला आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात अडीच लाखांहून अधिक मुस्लिम मतदार आहेत. या मतदारांचा फायदा उचलण्यासाठी एमआयएमकडून धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्यात आला होता. वंचित बहुजन आघाडीने अब्दुल रहमान यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे धुळ्याची राजकीय समीकरणे बदलणार होती. अब्दुल रहमान यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन होणार असे बोलले जात होते. मात्र आता धुळ्यातून वंचितला मोठा धक्का बसला आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज छाननीअंती बाद झाला आहे. शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होण्याचा न्यायप्रविष्ठ निर्णय पूर्ण न झाल्याने निवडणूक आयोगाने अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद केला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार असल्याची अब्दुल रहमान यांनी माहिती दिली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. त्यामुळे आता हायकोर्ट याबाबत काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अब्दुल रहमान यांनी धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. ते पोलिस महानिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या वतीने त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी आपण राजकारणात येत आहोत, हा आपला मुख्य अजेंडा असल्याचे सांगत त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. मात्र आता त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR