गुवाहाटी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सध्या आसाममधून जात आहे, मात्र गेल्या दोन दिवसांपासून येथे संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांवर आसाममध्ये एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी भाजपवर टीका केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, भाजपने आमच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या दरम्यान, हिंसाचाराचा अवलंब केला, पण आम्ही हिंसाचार करणार नाही. हिंसेला हिंसेने आवर घालता येत नाही, हिंसेला प्रेमानेच आवरता येऊ शकतो. आसाम हे प्रेम आणि बंधुत्वाचे राज्य आहे.
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान त्यांनी भाजपवर द्वेष पसरवल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे नियंत्रित करत आहेत. आसामचे मुख्यमंत्री हे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री असल्याचा आरोप करत ते म्हणाले की, देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आसामचा आहे. तुमचे मुख्यमंत्री प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्याकडून पैसे घेतात. यात्रेच्या प्रवासाचा पुढचा मुक्काम पश्चिम बंगालमध्ये असणार आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या इंडियन नॅशनल स्टुडंट्स युनियनचे प्रभारी कन्हैया कुमार म्हणाले की, ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या देशात इंग्रजांचा पराभव केला, जे त्यांच्या तोफांना आणि फाशीला घाबरले नाहीत आणि ते वर्षानुवर्षे तुरुंगात राहिले. ते लोक या बॅरिकेड्सना घाबरणार नाहीत. आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत आणि गांधीजींच्या मार्गावर चालत आहोत. आम्ही हिंसाचार करणार नाही आणि कायदा मोडणार नाही.
गांधी विरोधात दिल्लीतही एफआयआर दाखल
नऊ वर्षीय बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले की, या संदर्भात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी राहुल गांधी यांच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलाने संबंधित पोस्ट हटवण्यात आल्याची माहिती न्यायालयाला दिली.