इंफाळ : देशातील ईशान्येकडील महत्त्वाचे राज्य असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. सेनापती जिल्ह्यामध्ये सोमवारी दोन गटांमध्ये हिंसक चकमक उडाली. यावेळी अनेक घरे पेटवण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आणताना झालेल्या गोळीबारात केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान गंभीर जखमी झाला आहे.
पोलिस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास हिंसाचाराची सुरुवात झाली. कांगपोकपी जिल्ह्यातील ताफू कुकी गावात एका घराला आग लावण्यात आली. या घटनेचे तीव्र पडसाद सकाळच्या सुमारास सेनापती जिल्ह्यातही उमटले. नागा ताफू भागामध्ये अज्ञातांनी अनेक घरांना आग लावली. दरम्यान, सकाळी ९.२० च्या सुमारास ताफू नागा परिसरात दोन सशस्त्र गट आमनेसामने आले आणि त्यांच्यात जोरदार गोळीबार झाला. या चकमकीत सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात असलेला सीआरपीएफ जवान जखमी झाला. त्याला तातडीने सेनापती जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचारांनंतर त्याची प्रकृती सध्या ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
मोठ्या प्रमाणात जाळपोळ
सेनापती जिल्ह्यात घडलेल्या हिसाचारानंतर स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले. आक्रमक झालेल्या जमावाने सेनापती गेटजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २ वर लाकडी दांडके व टायर्स पेटवून देऊन रास्ता रोको केला. यामुळे या महत्त्वाच्या महामार्गावरील वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दरम्यान, ताफू कुकी व्हिलेज अथॉरिटीने या घटनेचा कडक शब्दांत निषेध केला आहे. निष्पाप नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करणा-यांचा प्रशासनाने २४ तासांच्या आत शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली त्यांनी केली.
















