नवी दिल्ली : हमासने इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी केलेला हल्ला हा क्रूरच होता. परंतु त्यानंतर इस्रायली लष्कराकडून सातत्याने सुरू असलेल्या हल्ल्यात हजारो निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने गाझाला जेल बनविले आहे. सुसंस्कृत जगात हिंसेला अजिबात स्थान नाही, असे सांगत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संयुक्त राष्ट्रात भारत सरकारच्या तटस्थ भूमिकेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे म्हटले.
हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडून गाझातील निष्पाप मुले, महिला, वृद्धांचा विचार न करताही हल्ले थांबत नाहीत. या लोकांचा हमासशी काहीही संबंध नाही, तरी त्यांचा बळी का घेतला जात आहे, असा सवालही सोनिया गांधी यांनी उपस्थित केला.
इस्रायलच्या हल्ल्यामध्ये हजारो लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. शहरांचे रूपांतर इमारतींच्या ढिगा-यात झाले. नाकाबंदी करून गाझातील लोकांना अन्न, पाणी, वीज तसेच अत्यावश्यक वस्तूंपासून वंचित ठेवणे हे अमानवीच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय कायद्यांचेही उल्लंघन करणारे आहे. निष्पाप लोकांचा भूकेविना बळी जाणे हे सुसंस्कृत जगाचे लक्षण नसल्याचेही सोनिया गांधी यांनी आपल्या लेखात नमूद केले आहे.
दोन्ही देशांना शांततेचा अधिकार
पॅलेस्टाइन आणि इस्रायल या दोघांनाही शांततेच्या वातावरणात जगण्याचा अधिकार आहे. त्यावर काँग्रेसचा ठाम विश्वास आहे. इस्रायलसोबत असलेल्या भारताच्या मैत्रीला आम्ही महत्त्व देतोच. पण, त्यांनी पॅलेस्टिनी नागरिकांना त्यांच्याच जन्मभूमीत बाहेर काढणे चुकीचे असल्याचे गांधी म्हणाल्या.
काँग्रेसची भूमिका राजकीय : भाजप
युद्धावर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मांडलेली भूमिका ही राजकीय असल्याची टीका भाजपने केली. ही भूमिका हमासचे अप्रत्यक्ष समर्थन करणारी आहे. त्यातून भारताच्या सुरक्षा आणि हितसंबंधांवर परिणाम करू शकतो, असे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले.