नवी दिल्ली :विराट कोहलीची क्रेझ जगभरात इतकी पसरली आहे की, प्रत्येकाला त्याची एक झलक पाहायची असते. आणि जेव्हा जेव्हा चाहत्यांना संधी मिळते तेव्हा ते त्याला भेटण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. अशा परिस्थितीत काही चाहते सुरक्षा कवच भेदत विराटला भेटण्यासाठी मैदानात उतरतात. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारत विरुद्ध अफगाणिस्तान दुस-या टी-२० सामन्यादरम्यान अशीच घटना घडली.
इंदूरच्या पोलिस प्रशासनाला चकवा देत एका चाहत्याने विराट कोहलीला भेटण्यासाठी थेट मैदानात एन्ट्री मारली. पण आता या सुरक्षा कवचबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्या चाहत्याने सुरक्षेचा भंग केला होता त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेकवेळा घडले आहे, जेव्हा चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी सुरक्षेचा भंग करत मैदानात घुसले आहेत. भारत-अफगाणिस्तान दुस-या टी-२० सामन्यादरम्यानही होळकर स्टेडियमच्या मैदानात क्षेत्ररक्षण करणा-या विराट कोहलीजवळ जाऊन एका तरुणाने त्याला मिठी मारली.
मीडिया रिपोर्टस्नुसार, कोहलीच्या या चाहत्याला मैदानातून ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेण्यात आले. एका पोलिस अधिका-याने सांगितले की, युवकाकडे सामन्याचे तिकिट असून तो नरेंद्र हिरवाणी गेटमधून होळकर स्टेडियममध्ये दाखल झाला. तो तरुण कोहलीचा मोठा चाहता आहे आणि तो कोहलीला भेटण्याच्या इच्छेने प्रेक्षक गॅलरीच्या कुंपणावर चढून मैदानात आला. तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत असून चौकशीच्या आधारे याप्रकरणी पुढील कारवाई केली जाईल.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना ६ गडी राखून जिंकला आणि मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. मात्र, या सामन्यात भारताच्या विजयापेक्षा विराट कोहलीच्या एका चाहत्याचीच चर्चा होत आहे.