36.9 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रमतदानाचा टक्का वाढेना

मतदानाचा टक्का वाढेना

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यात राज्यातील ११ मतदारसंघांत तुलनेने कमी म्हणजेच सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले. कोल्हापूरमध्ये सर्वाधिक ६३.७१ टक्के तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामतीत केवळ ४५.६८ टक्के मतदान झाले. त्यानंतर एका तासात मतदानाचा टक्का वाढला. परंतु त्या तुलनेत सरासरी मतदानाचा टक्का कमीच आहे. दरम्यान, सायंकाळी ६ पर्यंत सोलापुरात ५८, माढा लोकसभा मतदारसंघात ६०, लातूर लोकसभा मतदारसंघात ६१.४१, धाराशिव लोकसभा मतदारसंघात ६० टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले.

मागच्या वेळी या टप्प्यात जवळपास ६२ टक्के मतदान झाले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे, उदयनराजे भोसले, शाहू महाराज, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे, अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह २५८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. धाराशिव जिल्ह्यात चाकूहल्ल्यात झालेला एकाचा मृत्यू व सांगोला तालुक्यात मतदान यंत्र जाळण्याच्या घटनांमुळे आजच्या मतदानाला गालबोट लागले.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या २ टप्प्यांत २०१९ च्या तुलनेत कमी मतदान झाले मात्र तिस-या टप्प्यात सर्वच मतदारसंघात अत्यंत अटीतटीची निवडणूक झाल्याने मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा होती; पण मतदानाचा टक्का घसरला. सर्वात चुरशीची निवडणूक झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार त्या खालोखाल हातकणंगलेमध्ये ६२.७१ टक्के मतदान झाले आहे. बारामतीत सर्वात कमी मतदान झाले असून ५ वाजेपर्यंत ४५.६८ टक्के मतदान झाले. अर्थात संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असते. ६ वाजता जे मतदार मतदान केंद्रांवर येतात, त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येतो. त्यामुळे अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू असते. यामुळे ५ वाजताच्या आकडेवारीत ३ ते ४ टक्के वाढ होऊ शकेल; पण तसे झाले तरी २०१९ च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी कमी राहणार आहे.

मतदान होत असलेल्या मतदारसंघात बहुतांशी दुरंगी लढत होत असून अनेक ठिकाणी उमेदवारांपेक्षा स्थानिक नेत्यांसाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्वाची आहे. लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे. कारण बारामती लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच पवार विरुद्ध पवार अशी लढत होत आहे. येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळेविरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार आमने-सामने उभ्या असल्या तरी खरा संघर्ष शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यात आहे. या संघर्षातून बारामतीवर वर्चस्व कुणाचे हे सिद्ध होणार असल्याने शरद पवार यांचा ५ दशकांचा राजकीय अनुभव पणाला लागला आहे तसेच अजित पवार हेही सर्वशक्तीनिशी मैदानात उतरले आहेत त्यामुळे बारामतीची लढत सार्वधिक चर्चेची ठरली आहे. त्यानंतर चर्चा आहे ती रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या लढाईची. येथून नारायण राणे हे भाजपच्या चिन्हावर प्रथमच निवडणूक लढवत आहेत. त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचे आव्हान आहे.

राऊत हे २०१४ आणि २०१९ असे २ वेळा निवडून आले असून कोकणी मतदार त्यांना हॅट्ट्रिकची संधी देणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनंत गीते हे तिस-यांदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्यात लढत आहे. अर्चना पाटील या भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे आणि भाजपचे सुधाकर शृंगारे यांच्यात सामना होत आहे. काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदेंना सोलापूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. भाजपच्या आमदार राम सातपुते यांच्याशी त्यांची लढत झाली.

माढामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात लढत होत आहे. मोहिते पाटील कुटुंबाने भाजप सोडून शरद पवार यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. सांगलीत भाजपचे संजयकाका पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेस बंडखोर विशाल पाटील अशा ३ पाटलांमध्ये तिरंगी लढत होत आहे. सातारा हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. पक्षाच्या स्थापनेपासून म्हणजे १९९९ पासून सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. या वेळी भाजपने राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा गड ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने येथून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांना काँग्रेसच्या शाहू महाराज यांनी आव्हान दिले आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी, शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने आणि शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरूडकर अशी तिरंगी लढत आहे.

मतदानाला गालबोट, मतदान यंत्र जाळले
तिस-या टप्प्यात काही तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. धाराशिव व माढा मतदारसंघातील दोन घटनांमुळे मतदानाला गालबोट लागले. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी या ठिकाणी मतदान केंद्राजवळ दोन गटांत राडा झाला. या वेळी झालेल्या चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे मतदान प्रक्रिया सुरू असताना एका मतदाराने ईव्हीएम मशिनच पेटवून दिल्याची घटना घडली. मतदान केंद्र अधिका-यांनी त्या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आधीचे मतदान सुरक्षित असून मतदान यंत्र बदलून उर्वरित लोकांचे मतदान घेतले.

बारामतीत आरोप-प्रत्यारोप
बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबात तीव्र संघर्ष सुरू आहे. प्रचारात वातावरण तापलेले होते. आज मतदानाच्या वेळीही संघर्षाच्या ठिणग्या पडल्या. सुप्रिया सुळे यांनी मतदान केल्यानंतर अजित पवार यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईंची भेट घेतली. यामुळे सगळेच गोंधळात पडले होते. नंतर अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी आईला मतदानाला आणल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना अजित पवार यांच्यावर टीका केली.

आ. भरणे यांची शिवीगाळ
अजित दादांचे समर्थक व माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांला शिवीगाळ केल्यामुळे वातावरण तापले होते. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून मतदानासाठी पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला. त्यानंतर खुद्द सुप्रिया सुळे यांनी भरणे यांच्या विरोधात तक्रार नोंदवली.

 

११ लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची ५ वाजेपर्यंतची टक्केवारी. (कंसात २०१९ व २०१४ ची मतदानाची टक्केवारी)

लातूर – ५५.३८ टक्के. (६२.४४ % – ६२.६९ %)
सांगली – ५२.५६ टक्के. (६५.९२% – ६३.५२%)
बारामती – ४५.६८ टक्के (६१.८२% – ५८.८३%)
हातकणंगले – ६२.१८ टक्के (७०.६% – ७३%)
कोल्हापूर – ६३.७१ टक्के (७०.८६% -७१.७२%)
माढा – ५०.०० टक्के (६३.७७% – ६२.५३%)
उस्मानाबाद – ५२.७८ टक्के (६३.७६%- ६३.६५%)
रायगड – ५०.३१ टक्के (६२.१७% – ६४.४७%)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग- ५३.७५ टक्के. (६१.९९%, ६५.५६%)
सातारा- ५४.११ टक्के. (६०.४७%- ५६.७९%)
सोलापूर – ४९.१७ टक्के ( ५८.६७% -५५.८८%)

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR