मुंबई : व्याख्या, विख्खी, वुख्खू हे तीन शब्द कानावर पडले की डोळ्यासमोर येतात ते अशोक सराफ. हा डायलॉग आहे ‘धुमधडाका’ सिनेमातील. या चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबत महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे मुख्य भूमिकेत होते. यातील हा प्रसिद्ध डायलॉग एका मजेशीर किस्स्यातून तयार झाला आहे. या संवादामागचा भन्नाट किस्सा अशोक सराफ यांनी सांगितला आहे.
अशोक सराफ यांनी दिलेल्या मुलाखतीत व्याख्या, विख्खी, वुख्खू या डायलॉगमागचा भन्नाट किस्सा सांगितला. त्यात अशोक सराफ म्हणाले की, व्याख्या, विख्खी, वुख्खू हा डायलॉग इतका प्रसिद्ध होईल असे वाटलेदेखील नव्हते. त्यावेळेला माझ्याकडून चुकून झालेली ती अॅक्शन होती. ती कन्टिन्यू केली पुढे. व्याख्या, विख्खी, वुख्खू कुठून निघते? हे स्क्रीप्टमध्ये लिहिलेले नव्हते. ते माझे मीच बोललो होतो. जेव्हा धनाजीराव वेष बदलून येतो. मुलाचा बाप बनून येतो तेव्हा तो गेटअप बदलला आणि त्याच्या हातात पाइप दिला.
पाइपमधला तंबाखू ओढणे खूप कठीण असतो. तो घश्याला लागतो. समोर शरद तळवळकर उभे होते. मी तोंडात पाइप पकडून काय वाकडोजी धने असा डायलॉग बोलतो. त्यांचे नाव मी कधीच सरळ घेतले नाही. धणेजी वाकडे काय वाटेल ते नाव घ्यायचो. मी बोललो माळी बुवा आणि तंबाखू घशाला बसला. तेव्हाच माझ्या तोंडून व्याख्या असे शब्द बाहेर पडला. मग तिथे कट म्हटले. पण त्यावेळी डोक्यात आले की हेच कन्टिन्यू केले तर मग मी ते डायलॉग बोललो.