26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रविदर्भात २४ तासांत अतिजोरदार पावसाचा इशारा

विदर्भात २४ तासांत अतिजोरदार पावसाचा इशारा

हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

नागपूर : येत्या २४ ते ४८ तासात चंद्रपूर व गडचिरोलीसह विदर्भात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विभागाने याबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पूर्व विदर्भात दोन दिवस शांत राहिलेले ढग मुसळधार बरसण्याची शक्यता आहे.

ईशान्य अरबी समुद्रात सध्या कुंड तयार झाला आहे, जो पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या खो-यात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयाकडे सरकत आहे. तिथून उत्तर गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड व झारखंड होत दक्षिणेकडे सरकत आहे. या प्रभावानेच ७ जुलै रोजी चंद्रपूर, गडचिरोली व गोंदियात अत्याधिक जोराचा पाऊस होईल, असा वेधशाळेचा अंदाज आहे. याशिवाय नागपूर, भंडारा, वर्धा व अमरावती जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर ८ जुलै रोजी नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचे सत्र कायम राहिल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. सोबत विजा व ढगांचा जोरात गडगडाट होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.

दरम्यान पूर्व विदर्भात दोन दिवस ढग शांत राहिले. चंद्रपूरला रविवारी सकाळपर्यंत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. गोंदिया जिल्ह्यात तुरळक पावसाची हजेरी लागली. नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली भागात हलकी रिपरिप झाली. पश्चिम विदर्भात मात्र चांगल्या सरी बरसल्या. रात्री अकोला ३० मि.मी.. अमरावती १०.६ मि.मी.. यवतमाळ १५.५ मि.मी. चांगला पाऊस झाला. यवतमाळला रविवारी दिवसाही १८ मि.मी. पावसाची नोंद झाली. बुलडाणा जिल्ह्यातही २१ मि.मी. नोंदीसह जोरात पाऊस झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR