15.3 C
Latur
Thursday, November 28, 2024
Homeअंतरराष्ट्रीयशरीरातील पांढ-या पेशी पुन्हा सक्रिय करता येणार

शरीरातील पांढ-या पेशी पुन्हा सक्रिय करता येणार

चेह-यावरील सुरकुत्याही कमी होणार संशोधकांनी शोधला फार्म्यूला

न्यूयॉर्क : एका विशिष्ट वयानंतर तारुण्य आटू लागते, शरीर थकते. वार्धक्याच्या खुणा चेह-यावर दिसू लागतात. चेह-यावर सुरकुत्या घालवण्यासाठी सर्व जण निरनिराळे महागडे उपचार सुरू करतात; परंतु चेह-यावरील सुरकुत्या काही जात नाहीत; पण चिंता करू नका. अमेरिकेतील वैज्ञानिकांनी असा काही शोध लावला आहे की, तुमच्या चेह-यावर कधीही सुरकुत्या पडणार नाही, तुम्ही नेहमी जवान दिसाल आणि तरुणांप्रमाणेच सर्व कामे वेगाने करू शकाल. न्यूयॉर्कमधील कोल्ड स्त्रिंग हार्बर लॅबोरेटरीतील संशोधकांनी शरीरातील पांढ-या पेशींना पुन्हा सक्रिय करण्याचे तंत्र शोधून काढले आहे.

संशोधकांनी ‘मॅक्रोफेजेस’ नावाच्या पांढ-या रक्त पेशींचा एक प्रकार शोधून काढला आहे, जो ट्यूमरला मुळापासून बरा करु शकतो. कॅन्सरला शरीरातील एखाद्या भागावर हल्ला करण्यापासून देखील या पांढ-या पेशी प्रतिबंधित करतात. स्तनाचा कॅन्सर, मेंदूचा कॅन्सर किंवा त्वचेच्या कॅन्सरवर उपचार करणे कठीण असते. कॅन्सरशी लढणा-या रुग्णांना शस्त्रक्रिया हाच पहिला पर्याय असतो. तरीही शस्त्रक्रिया कर्करोगाच्या सर्व पेशी काढून टाकू शकत नाही आणि त्यामुळे उरलेल्या पेशी वाढू शकतात आणि संपूर्ण शरीरात पसरू शकतात. मॅक्रोफेजेस नावाच्या पांढ-या रक्त पेशी केवळ कर्करोगाच्या पेशी काढून टाकत नाही, तर रोगप्रतिकारक शक्तीला भविष्यात कर्करोगाच्या पेशींना ओळखण्यास आणि त्यांना मारण्यास देखील शिकवतात. तर याशिवाय ट्यूमरच्या वस्तुमानामध्ये प्रवेश करू शकतील असे रेणू तयार करणे आव्हानात्मक आहे असे अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील प्राध्यापक डेनिस डिशर म्हणाले.

तंत्र कसे काम करते?
वय वाढत जाते त्यानुसार शरीरातील पेशींवर परिणाम होत जातो. शरीरात स्थूलपणा वाढत जातो. वय वाढलेल्या पेशी हळूहळू आपल्याप्रमाणे प्रतिपेशींची निर्मिती करू शकत नाहीत. पुढे ही निर्मितीची प्रक्रिया थांबते. त्वचेत नव्या पेशी निर्माण होत नाहीत. जुन्या पेशींमुळे त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. संशोधकांनी कायमेरिक अँटीजन रिसेप्टर थेरपीद्वारे शरीरातील ‘टी सेल्स’मध्ये काही बदल घडवून आणले आहेत. ही थेरपी वृद्ध झालेल्या पेशींना दुरुस्त करून पूर्वीप्रमाणे सक्रिय बनविते, असे या संशोधनात दिसून आले आहे.

तरुण बनले अधिक चपळ
संशोधकांनी ‘सीएआर’ थेरपीची चाचणी उंदरावर केली असता आश्चर्यकारक परिणाम दिसून आले. यामुळे वृद्ध झालेले उंदीर तरतरीत झालेले दिसले. त्यांचे वजनही कमी झाले. पचनक्रियेत सुधारणा झाली. त्यांचे व्यवहार तरुण उंदरांप्रमाणे झाल्याचे दिसले. या प्रयोगानंतर तरुण उंदीर आणखी चपळ झाल्याचे दिसून आले.

डायबेटिसवर रामबाण उपाय
लससंशोधकांच्या पथकात असलेल्या कोरिना अमोर वेगास यांनी सांगितले की, आतापर्यंत रक्तातील पांढ-या पेशी म्हणजे ‘टी सेल्स’ना पुन्हा प्रोग्राम करणे शक्य झालेले नव्हते; परंतु आमच्या संशोधनामुळे ‘टी सेल्स’ला नवे रूप देणे शक्य होणार आहे. ‘टी-सेल्स’चे आयुष्य वाढविण्यास मदत होणार आहे. स्थूलपणा, तसेच मधुमेहाच्या रुग्णांना ही थेरपी खूप लाभदायक ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR