22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रमावळमधील घटलेल्या मतांचा फटका कुणाला?

मावळमधील घटलेल्या मतांचा फटका कुणाला?

पिंपरी : प्रतिनिधी
पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात यंदा दोन्ही शिवसेनेत चुरशीची लढत झाली. पण, मतदानात चुरस दिसून आली नाही. मागीलवेळीपेक्षा पाच टक्क्यांनी मतदानात घट झाली आहे. घटलेल्या मतांचा कोणाला फटका बसणार याचे आखाडे बांधण्यास सुरुवात झाली आहे. मावळमध्ये ५५.८७ टक्के मतदान झाले असून घाटाखालील उरण, कर्जत विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक तर पनवेलमध्ये सर्वांत कमी मतदान झाले.

महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासह ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र, खरी लढत बारणे आणि वाघेरे यांच्यातच झाली. मावळमध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. २५ लाख ८५ हजार १८ मतदारांपैकी केवळ १४ लाख १८ हजार ४३९ मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. त्यात सात लाख ७७ हजार ७४२ पुरुष तर सहा लाख ४० हजार ६५१ महिला आणि इतर ४६ जणांनी मतदान केले.

उरण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे. ३ लाख १९ हजार ३११ मतदारांपैकी दोन लाख १४ हजार १६९ मतदारांनी (६७.०७ टक्के) मतदान केले. उरणमधून महाविकास आघाडीचे उमेदवार वाघेरे यांच्या पारड्यात जास्त मते पडतील असा अंदाज लावला जात आहे. त्याखालोखाल कर्जत विधानसभा मतदारसंघात ६१.४० टक्के मतदान झाले. कर्जत, खालापूर, खोपोली परिसरात दुपारी अवकाळी पाऊस झाला. त्याचा मतदानावर परिणाम झाल्याचे दिसून आले.

पनवेलमधील ५ लाख ९१ हजार ३९८ पैकी २ लाख ९५ हजार ९७३ मतदारांनी मतदान केले. पनवेलमध्ये सर्वांत कमी मतदान झाले असून भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शहरी भाग असल्याने बारणे यांना मताधिक्य मिळू शकेल, असे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या सुनील शेळके यांच्या मावळ विधानसभा मतदारसंघातील ३ लाख ७३ हजार ४०८ पैकी २ लाख ६,९४९ (५५.४२ टक्के) लोकांनी मतदान केले. मावळमध्ये दोन्ही उमेदवारांना मतदान झाल्याचे दिसून आले.

सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या चिंचवडमध्ये ५२.२० टक्के मतदान झाले. ६ लाख १८ हजार २४५ पैकी ३ लाख २२ हजार ७०० जणांनी मतदान केले. पर्यायाने जगताप कुटुंबीयांचे वर्चस्व असलेल्या चिंचवड मतदारसंघात कमी मतदान झाल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार वाघेरे यांना सांगवी, रहाटणी, काळेवाडी भागात चांगले मतदान झाल्याची चर्चा आहे. तर, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या पिंपरी विधानसभा मतदारसंघात ५०.५५ टक्के मतदान झाले. पिंपरीत वाघेरे यांचे वर्चस्व असून त्यांना आघाडी मिळू शकेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR