पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये पुन्हा एकदा भाकरी फिरणार का? अशी शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाच्या वतीने सर्व प्रवक्ता या पदावरील नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या संदर्भातले आदेश दिले आहेत.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार पक्षाच्या १६ एप्रिल रोजी झालेल्या बैठकी नंतरच याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीमध्ये सरकारच्या वतीने पाणीपत येथे बनवण्यात येणा-या स्मारकाला समर्थन नको, अशी भूमिका पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मांडली होती. मात्र, जितेंद्र आव्हाड यांच्या या भूमिकेला पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे या बैठकीमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यांनी मांडलेल्या भूमिकेला होणारा विरोध पाहता महेश तपासे यांची मुख्य प्रवक्ता पदावरून उचलबांगडी करण्यात येणार आहे. मात्र, त्यांची उचलबांगडी करण्यासाठी आधी सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
इतर नेते तपासे यांच्यावर नाराज
महेश तपासे यांनी या निर्णयाला केलेला विरोध यामागे देखील काही कारण आहे. महेश तपासी यांचे आजोबा आणि माजी राज्यपाल गणपत तपासे यांनी याआधी पाणीपत येथे शौर्य स्मारक बांधले आहे. त्यामुळे सरकारच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या स्मारकाला महेश तपासे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. या संदर्भात महेश तपासे यांनी आधीच पाठिंबा दिल्यामुळे पक्षातील इतर नेते त्यांच्यावर नाराज असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळेच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.