37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयवंदे भारत ट्रेनची निर्यात होणार?

वंदे भारत ट्रेनची निर्यात होणार?

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती देशभरात ८२ वंदे भारत एक्स्प्रेस सुरू

नवी दिल्ली : वंदे भारत ट्रेनचे स्लीपर व्हर्जन लवकरच सादर केले जाणार आहे. यावर वेगाने काम सुरू आहे. विद्यमान वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून आणखी काही मार्गांवर वंदे भारत ट्रेन प्रवाशांसाठी सेवेत दाखल होणार असल्याची चर्चा आहे. अशातच आता भारतीय रेल्वे वंदे भारत ट्रेनच्या निर्यातीवर काम करत असून याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे.

एका कार्यक्रमात बोलताना अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत ट्रेनच्या निर्यातीबाबत भाष्य केल्याचे सांगितले जात आहे. वंदे भारत ट्रेनची संकल्पना आणि प्रत्यक्षात परिचालन यासंदर्भात बोलताना वंदे भारत ट्रेनच्या निर्यातीबाबत रेल्वेमंत्री यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. आताच्या घडीला देशभरात ८२ वंदे भारत एक्स्प्रेस सुरू आहेत. तसेच वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची गती आणखी वाढवण्यावर भर दिला जात आहे. याशिवाय, नवी दिल्ली-मुंबई आणि नवी दिल्ली-हावडा या मार्गांवर चालवल्या जात असलेल्या वंदे भारत ट्रेनचा वेग ताशी १६० किमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

परदेशातून वंदे भारत ट्रेनची मागणी
वंदे भारत ट्रेनचे स्वदेशी डिझाइन आणि कार्यक्षमतेने तयार करण्यासाठी रेल्वे मंत्रालय सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील युनिट्स व्यतिरिक्त फॅक्टरीतील कामकाज सक्षम करत आहे. आपल्या इंजिनियर्सच्या मदतीने देशात वंदे भारत ट्रेन तयार करणे हे मोठे आव्हान होते. आम्ही हे आव्हान पेलले. वंदे भारत ट्रेनबाबत अनेक देशांनी चौकशी केली आहे. अनेक देशांना वंदे भारत ट्रेन हवी आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत भारत हा इतर देशांना वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन निर्यात करण्यास सक्षम असेल, असा विश्वास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे.

ट्रेनमध्ये करण्यात आले बदल
वंदे भारत ट्रेनसंदर्भात प्रवाशांच्या ज्या प्रतिक्रिया समोर येत आहेत, त्यानुसार ट्रेनमध्ये बदल केले जात आहेत. स्लीपर वंदे भारत ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. प्रवाशांच्या सोयी-सुविधा आणि संरक्षणासाठी वंदे भारत ट्रेनमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR