लखनौमध्ये भारत-इंग्लंड सामना सुरू होण्यापूर्वी ‘अॅकॉर्डिंग टू द लॉ ऑफ अॅव्हरेजेस इंडिया शुड लूज वन’ असा अंदाज काही क्रिकेट पंडितांनी व्यक्त केला होता. तसे झाल्यास या सामन्यातच ते घडावे असेही त्यांचे म्हणणे होते. कारण उपांत्य फेरीत तसे होणे परवडणारे नव्हते. इंग्लंडने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतले आणि थोड्याच वेळात शुबमन गिल आणि विराट कोहली तंबूत परतले. रोहितने नेहमीच्या थाटात दे दणादण सुरू केले होते परंतु गिल आणि कोहली स्वस्तात बाद झाल्यानंतर रोहितच्या चेह-यावर ‘लॉ ऑफ अॅव्हरेजेस’चा नियम झळकू लागला होता.
कारण त्याचा झपाटा कमी झाला होता, त्याने गियर बदलले होते. श्रेयस अय्यर पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूवर बाद झाला तेव्हा भारताची घसरगुंडी उडणार असे वाटले. खेळपट्टीचे वर्तन दुटप्पी बनले होते. चेंडू कधी खाली रहायचा तर कधी उसळी घ्यायचा. संकट काळात बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणारा लोकेश राहुल रोहितच्या मदतीला आला दोघांनी ९१ धावांची भागीदारी केल्याने संघाची प्रकृती सुधारली. मात्र राहुलला अचानक षटकार मारण्याची अवदसा आठवली आणि संघ पुन्हा संकटात सापडला.
रोहित ८७ वर बाद झाला. टी-२० चा वेताळ सूर्यकुमार एकदिवसीय सामन्यात प्रभाव दाखवू शकला नाही परंतु त्याच्या ४९ आणि बुमराच्या १६ धावांमुळे भारताने सव्वा दोनशेचा पल्ला पार केला. विजयाचा षटकार मारण्यासाठी ही धावसंख्या पुरेशी नव्हती. परंतु भारतीय गोलंदाजांच्या करामतीमुळे २२९ ही धावसंख्याही प्रचंड मोठी भासली. बुमरा आणि महंमद शमी ही दोन अण्वस्त्रे पूर्वतेजाने आग ओकत आहेत. बुमराने प्रारंभीच मलानचा त्रिफळा उद््ध्वस्त केला आणि पुढच्याच चेंडूवर रूटच्या हाती भोपळा दिला तेव्हा साहेबांची साडेसाती सुरूच राहणार याची खात्री पटली.
नंतर शमीने स्टोक्सला ९ चेंडूत असे काही छळले की दहाव्या चेंडूवर ‘जगण्याने छळले होते’ असे म्हणत तंबूचा रस्ता धरला. ४ बाद ३९ नंतर कुलदीपच्या सर्वोत्तम चेंडूने बटलरच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि इंग्लंडचे पराभवाचा दुष्काळ संपवण्याचे मनोरथ उद्ध्वस्त झाले. २०१९ च्या विश्वकप स्पर्धेत कुलदीपने अशाच चेंडूवर बाबर आझमच्या दांड्या उडवल्या होत्या. इंग्लंडच्या शवपेटीवर खिळा ठोकला गेला होता. गोलंदाजांनी १०० धावांनी भारताला सामना जिंकून दिला. भारताने विजयाचा षटकार मारला तर गुणतालिकेत इंग्लीश संघ १० व्या क्रमांकावर फेकला गेला. गतविजेते सध्या खालून पहिले आहेत. पाकमध्ये २०१५ साली होणा-या चॅम्पीयन्स स्पर्धेत पहिल्या सात क्रमांकांना प्रवेश मिळणार आहे. गतविजेत्यांचे काय? आकाशातला गॉड इतका निष्ठूर कसा?