नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होऊ शकते आणि ते ख्रिसमसच्या आधी संपण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्थेने बुधवारी ही माहिती दिली. ३ डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीनंतर काही दिवसांनी हे अधिवेशन सुरू होऊ शकते. या अधिवेशनात प्रमुख फौजदारी कायद्यांच्या जागी तीन महत्त्वाच्या विधेयकांवर विचार होण्याची शक्यता आहे. गृहविभागाच्या स्थायी समितीने नुकताच तीन विधेयकांवर आपला अहवाल मंजूर केला.
हिवाळी अधिवेशन सामान्यतः नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होते आणि ख्रिसमसच्या (२५ डिसेंबर) आधी संपते. संसदेत प्रलंबित असलेले दुसरे मोठे विधेयक मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित आहे. पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलेले हे विधेयक विरोधी पक्ष आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधानंतर संसदेच्या विशेष अधिवेशनात मंजूर करण्यासाठी सरकारने आग्रह धरला नाही. या विधेयकाद्वारे सरकारला मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांचा दर्जा कॅबिनेट सचिवांच्या बरोबरीने आणायचा आहे. सध्या त्यांचा दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समकक्ष आहे.